हिंगोलीत राजकीय भुकंप:माजी समाजकल्याण सभापती मुनीर पटेलांचा शिंदेसेनेत प्रवेश, वसमत, औंढा तालुक्यात पक्षाला बळ मिळणार
![]()
काँग्रेस, राष्ट्रवादी पुन्हा काँग्रेस अन राष्ट्रवादी असा राजकिय प्रवास करीत माजी समाज कल्याण सभापती मुनीर पटेल यांनी अखेर शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. गुरुवारी ता. 21 मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदेसेनेला वसमत व औंढा नागनाथ तालुक्यात बळ मिळणार आहे. हिंगोली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती मुनीर पटेल हे राजकिय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. हिंगोली जिल्हा परिषदेत समाज कल्याण सभापती असतांना त्यांनी गरजूंना योजनांचा लाभ मिळवून दिला. या शिवाय चुकीच्या प्रश्नावर जिल्हा प्रशासनाला धारेवर धरण्याचे कामही त्यांनी केले. दरम्यान, काँग्रेस पक्षानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र राष्ट्रवादीत त्यांचे जास्त काळ मन रमलेच नाही. त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर जिल्हाध्यक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. हि जबाबदारीही त्यांनी पार पाडली. त्यांनी पुुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मागील काही दिवसांपासून ते राजकिय क्षेत्रापासून बाजूला झाले होते. त्यांचा जनसंपर्क व नागरीकांचे प्रश्न सोडविण्याची हातोटी लक्षात घेऊन शिंदेसेनेने त्यांना पक्षात घेण्याचे प्रयत्न चालविले होते. त्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार बांगर यांच्यासह शिंदेसेनेचे वसमत तालुकाध्यक्ष राजू चापके, युवा जिल्हा प्रमुख राम कदम, नगरसेवक गुड्डू बांगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मुनीर पटेल यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे वसमत व औंढा नागनाथ तालुक्यात पक्षाला मोठे बळ मिळणार असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला चांगलाच फायदा होणार असल्याचे राजकिय वर्तुळातून बोलले जात आहे.
