सोलापूर अतिक्रमण हटाव मोहिम:तिसऱ्या दिवशी एका इमारतमधील एकच अनधिकृत गाळा पाडला, नव्याने 120 इमारतींची यादी तयार;आयुक्तांची मंजुरी मिळताच पाडकाम
![]()
शहरातील 35 इमारतींमधील अनधिकृत बांधकामाच्या पाडकाम मोहिमेला 26 मेपर्यंत ब्रेक लागला आहे. त्यानंतर कुठल्या इमारतीवर हातोडा पडेल हे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत महापालिकेकडून नव्याने 120 इमारतींमधील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे काम होती घेण्यात आले. पुढील दोन दिवसांत यादी तयार करून आयुक्तांना मेलवर पाठवण्यात येईल. मंजुरी येताच सर्वांना नोटीस बजावून पाडकाम करण्याची मोठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याची माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. यापूर्वीच 96 इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यावेळी अनेकांनी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना भेटून शहरात फक्त 96 बोगस बांधकामे नसून अनेक आहेत, असे सांगितले. त्यानंतर आयुक्तांनी विशेष सर्व्हे करण्याची मोहीम राबवली. त्यात 120 इमारतींमध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या सर्वांना जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नोटीस देण्यात आली. पैकी 17 जणांनी अनधिकृत बांधकाम स्वत:हून पाडून घेतले. निवडणुकीमुळे हे काम थांबले होते. आता पुन्हा 120 इमारतींची यादी तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. 120 इमारतींचा परिसर लक्ष्मी पेठ, मुरारजी पेठ, मजरेवाडी, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, बाळीवेस, मंगळवार पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, मोदी, डोणगाव रोड, आसरा रोड, विजापूर रोड, जुळे सोलापूर, कर्णिक नगर, एकता नगर, अशोक चौक, लष्कर, रेल्वे लाईन, शेळगी, अवंती नगर आणि पूर्वभाग. 26 मेनंतर न्यायालयाच्या निर्णयानुसार मोहीम होईल 35 पैकी 5 ठिकाणच्या इमारतींमधील अनधिकृत बांधकाम पाडले. तोपर्यंत काहींनी न्यायालयात जाऊन स्थगिती आणली. 26 मेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. न्यायालयाने आदेश देताच पाडकामाची मोहीम पुन्हा होईल. तसेच नव्याने 120 इमारतींच्या अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. – नीलकंठ मठपती, कार्यकारी अभियंता, महापालिका होटगी रोडवरच थांबले अवैध बांधकाम पाडले गुरुवारीही अवैध बांधकामांवर हातोडा चालवण्याचे काम सुरूच होते. होटगी रोडवरील स्कायलाइन इमारतीमधील एक अनधिकृत गाळा पाडण्यात आला. पोलिसांचा फौजफाटा घेऊनच महापालिकेने ही मोहीम राबवली. त्यानंतर थांबवली.
