पंचायत विकास आराखडा ऑनलाईन प्रशिक्षणाला जि.प. विभागप्रमुखांची उपस्थिती:"सर्वांची योजना-सर्वांचा विकास" अंतर्गत नियोजन प्रक्रियेवर मार्गदर्शन
![]()
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात गुरुवारी “सर्वांची योजना-सर्वांचा विकास” या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन व्हर्च्युअल प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पंचायत विकास आराखडा नियोजन प्रक्रियेवर आधारित या कार्यशाळेत जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत ग्रामपंचायत विकास आराखडा प्रभावीपणे तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ई-ग्राम स्वराज प्रणाली, पंचायत निर्णय ॲप्सचा वापर, ग्रामपंचायत प्रशिक्षण आराखडा, नियोजन प्रक्रिया तसेच पी.ए.आय. संदर्भातील माहिती सहभागी प्रशिक्षणार्थींना देण्यात आली. प्रशिक्षण कार्यशाळेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीराम कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब बायस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) बाळासाहेब रायबोले, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) स्नेहा धावडे, सहायक गट विकास अधिकारी मीना मसतकर आणि सुनील गवई उपस्थित होते. त्यांच्यासोबत तज्ज्ञ प्रशिक्षक, राष्ट्रीय ग्रामीण स्वच्छता अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच तालुका व्यवस्थापकही सहभागी झाले होते. कार्यशाळेमध्ये पंचायत स्तरावरील विकास आराखडे अधिक परिणामकारक, लोकसहभागावर आधारित आणि तंत्रज्ञानस्नेही पद्धतीने तयार करण्यावर भर देण्यात आला. ग्रामपंचायतींनी स्थानिक गरजा व उपलब्ध संसाधनांचा विचार करून सर्वसमावेशक विकास आराखडे तयार करावेत, असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. याच संदर्भात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी माहिती दिली की, ग्रामपंचायतींचे विकास आराखडे अधिक दर्जेदार, लोकाभिमुख व परिणामकारक होण्यासाठी याच महिन्यात तालुकास्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी प्रशिक्षणास पूर्ण वेळ उपस्थित राहून ‘क्वालिटी जीपीडीपी’ तयार करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
