वाढदिवसाच्या बहाण्याने बालविवाहाचा घाट:हळदीचा कार्यक्रम सुरू असताना 16 वर्षीय मुलीची सुटका, रामटेक तालुक्यातील घटना
![]()
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. घरात वाढदिवसाचा बहाणा करून हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच बाल संरक्षण पथकाने छापा टाकून मुलीची सुटका केली. बाल संरक्षण पथकाने सुरुवातीला मुलीच्या घरी भेट दिली असता ती तिथे नव्हती. अधिक चौकशी केल्यावर ती तिच्या मामाच्या गावी असल्याचे समजले. ग्राम बाल संरक्षण समितीकडून कारवाई सुरू असताना गावातील एका स्वयंघोषित समाजसेविकेने यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. याची गंभीर दखल घेत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी रामटेकचे तहसीलदार रमेश कोडापे यांच्याशी संपर्क साधून शासकीय यंत्रणा मागवून घेतली. पथकाने मामाच्या घरी भेट दिली तेव्हा नातेवाईकांनी ‘घरातील बालकाचा वाढदिवस असल्याने कार्यक्रम आयोजित केला आहे,’ असा बहाणा केला. मात्र, पथकाने बारकाईने पाहणी केली असता घरात हळदीचा कार्यक्रम सुरू असल्याचे स्पष्ट झाले. मुलीने दिलेल्या जबाबानुसार, ती या लग्नासाठी तयार नव्हती आणि नातेवाईक तसेच एका स्थानिक समाजसेविकेकडून तिच्यावर लग्नाचा दबाव टाकला जात होता. हा विवाह २० वर्षीय युवकासोबत लावून दिला जात होता. पोलिसांनी तत्परता दाखवत अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका केली. पुढील समुपदेशन आणि संरक्षणासाठी तिला बालगृहात दाखल करण्यात आले आहे. बालविवाहासारख्या बेकायदेशीर प्रकारांची माहिती नागरिकांनी त्वरित प्रशासनाला द्यावी, असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे. ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुश्ताक पठाण, प्रसेनजीत गायकवाड, साधना ठोंबरे, अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धडाडे, प्रियांका होटे, पोलिस उपनिरीक्षक वर्षा गायकवाड, सरपंच वर्षा हट्टी, ग्राम अधिकारी करुणा महाले, पोलिस पाटील वैशाली सलामे व अंगणवाडी सेविका विजया कश्यप यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.
