बनावट नोटांचे रॅकेट उघड, चौघांना अटक:गडचिरोली पोलिसांची नागपुरात कारवाई, बँकेतील डिपॉझिट मशीनमुळे झाला पर्दाफाश

0
28a0c6e8-8202-4502-b15a-afe3d0c70a9c_1779375441628.jpg




गडचिरोली जिल्हा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने नागपूरमध्ये बनावट चलनी नोटा तयार करणाऱ्या एका हायटेक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ३९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बँकेच्या डिपॉझिट मशीनमुळे या रॅकेटचा छडा लागला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रमोद टिकाराम कोवे (वय २३, रा. हळदा, जि. चंद्रपूर), आदित्य जनार्धन रेचनकर (वय १९, रा. आरमोरी रोड, गडचिरोली), मयुर लक्ष्मीकांत डोईजळ (वय ३१, रा. कॅम्प एरिया, गडचिरोली) आणि आदित्य लक्ष्मीकांत डोईजड (वय २६, रा. कॅम्प एरिया, गडचिरोली) यांचा समावेश आहे. या चौघांना २२ मे २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या रॅकेटचा पर्दाफाश ११ मे २०२६ रोजी झाला, जेव्हा आरोपी प्रमोद कोवे याने गडचिरोली येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम डिपॉझिट मशीनमध्ये १०० रुपयांच्या २१ बनावट नोटा (एकूण २,१०० रुपये) जमा केल्या. बँक तपासणीत हा प्रकार समोर आल्यानंतर, बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रतीक बाबाराव अनासने यांनी १५ मे रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रमोद कोवेला रात्रीच अटक केली. प्रमोद कोवेच्या चौकशीतून त्याने या बनावट नोटा गडचिरोली येथील आदित्य रेचनकरकडून घेतल्याचे समोर आले. आदित्य रेचनकर हा नागपूरमधील ‘चिटू’ नावाच्या व्यक्तीकडून या नोटा मिळवत होता. या माहितीच्या आधारे, गडचिरोली पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १६ मे रोजी रात्री नागपूरला रवाना झाले. तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून, पोलिसांनी नागपूरच्या त्रिमूर्ती नगरमधील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकला. या छाप्यात बनावट नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आणि उर्वरित तीन आरोपींना १७ मे रोजी नागपुरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी १५,००० रुपये किमतीचा एचपी कंपनीचा कलर इन टँक वायरलेस प्रिंटर, ५४० रुपयांचा जेके बाँड पेपरचा रिम, कटर आणि स्केलसह बनावट नोटांचा मोठा साठा जप्त केला. यामध्ये ५० रुपयांच्या नोटा छापलेली ३१ पाने (१,५५० रुपये), १०० रुपयांच्या नोटा छापलेली १८० पाने (१८,००० रुपये), २०० रुपयांच्या नोटा छापलेली ४ पाने (८०० रुपये) आणि कट केलेल्या नोटांची ५५७ पाने यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ३९,७०० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed