बोरदहेगाव परिसरात पंपावर गर्दी:डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रांगा, मशागतीच्या कामांसाठी इंधन मिळेना
![]()
परिसरात पेट्रोल, डिझेल, गॅसची टंचाई वाढत आहे. नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बोर दहेगाव परिसरातील गोळवाडी येथील पेट्रोल पंपावर मंगळवारी सकाळी डिझेलसाठी मोठी गर्दी झाली. वाहनधारकांच्या रांगा लागल्या. कॅन घेऊन आलेले लोकही रांगेत होते. पंपासमोर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत भर उन्हात लोक थांबले. पेट्रोल, डिझेलसाठी तीन-तीन तास रांगेत उभे राहावे लागले. पेट्रोल पंप चालक संकेत पाटील मिसाळ यांनी कर्मचाऱ्यांसह नियोजन केले. सर्वांना समप्रमाणात पेट्रोल, डिझेलचे वाटप केले. तरीही तुटवडा जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसाआड टँकर उपलब्ध केला जातो. डिझेलची मागणी विक्रमी वाढली आहे. मनमाडहून आलेला टँकर काही तासांत रिकामा होतो, असेही त्यांनी सांगितले. सध्या ग्रामीण भागात शेतीची पूर्वमशागत सुरू आहे. ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणी, मशागतीसाठी डिझेलची मागणी वाढली आहे. नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वैजापूर ते लासूर स्टेशनपर्यंत १० पेट्रोल पंप आहेत. तरीही पेट्रोल, डिझेलची कमतरता भासत असल्याचे शेतकरी गोविंद डिके यांनी सांगितले.
