नीट – एसएस काउन्सिलिंगला विलंब:देशभरातील डॉक्टरांवर बेरोजगारीची वेळ, ‘फेमा’चा आंदोलनाचा इशारा
![]()
नीट-एसएस २०२४-२५ च्या काउन्सिलिंग प्रक्रियेला होत असलेल्या अनिश्चित विलंबामुळे देशातील सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांवर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने ’ने (फेमा) वैद्यकीय समुपदेशन समितीला पत्र लिहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. एमसीसीच्या वेळापत्रकानुसार सुपर-स्पेशालिटीचे शैक्षणिक सत्र १० एप्रिल २०२६ रोजी सुरू होणार होते, मात्र मे महिना संपत आला तरी अद्याप काउन्सिलिंग प्रक्रिया पूर्णपणे ठप्प आहे. जानेवारी २०२६ मध्ये नीट-एसएसचा निकाल लागून ५ महिने उलटले आहेत. एप्रिलच्या सत्रात प्रवेश मिळेल या अपेक्षेने हजारो डॉक्टरांनी सीनियर रेसिडेंट व असिस्टंट प्रोफेसर पदांचे राजीनामे दिले होते, जे आता प्रशासकीय दिरंगाईमुळे सक्तीने बेरोजगार झाले आहेत. या गोंधळामुळे नवीन बॅच न आल्याने देशातील मोठ्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी, सध्या कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला असून रुग्णसेवेवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. फेमाने आता केंद्रीय आरोग्य मंत्री आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला या प्रकरणात त्वरित वैयक्तिक हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. एमसीसीने काउन्सिलिंगचे निश्चित वेळापत्रक त्वरित जाहीर केले नाही, तर देशभरात मोठे आंदोलन छेडण्याचा आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा थेट इशारा डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे.
