शनि अमावास्येला पूजाविधीनंतर वाद, मित्र-मैत्रिणीची भोंदू बाबाकडून हत्या:साक्रीत अघोरी थरार; घटनेनंतर काही तासांत भोंदूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
![]()
नाशिकचा बोगस ‘डॉक्टर खरात’ आणि सोलापूरचा ‘मनोहर मामा’ यांच्या भोंदुगिरीच्या घटना ताज्या असतानाच, आता धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातही अंधश्रद्धेची रक्तरंजित घटना समोर आली आहे. तेथे एका कथित भोंदूबाबाच्या आश्रमात शनी अमावस्येच्या रात्री पूजाविधीसाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भोंदूबाबाच्या सापडलेल्या रुमालावरून या घटनेचे बिंग फुटले आणि काही तासांतच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान, पूजाविधीनंतर झालेल्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मृत तरुणीच्या काकांनी केलेल्या तक्रारीवरून पुढे आली आहे. योगेश ऊर्फ भैय्या बापू खैरनार (रा. जैताणे, ता. साक्री) असे भोंदूबाबाचे नाव आहे. तर जयश्री रजनीकांत काकुस्ते (वय 25) आणि अक्षय गंगाधर सोनवणे दोघा मृतांची नावे आहेत. हे दोघे मित्र असून जयश्री एका फायनान्स कंपनीत एकत्र काम करत होती. तर अक्षय हा ग्र्रा.पं.त शिपाई असून वडिलोपार्जित केबलचा व्यवसाय करत होता. साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरातील रायपूर-भडगाव रस्त्यावर शनिवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेचे तोंड रूमालाने बांधले होते. शिवाय तिच्या मृतदेहावर दुचाकी (एम.एच.18 सी,एफ.8151) ही टाकण्यात आली होती. तो मृतदेह जयश्री काकुस्ते हीचा असल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले. तेथून तपास सुरु केला. मृत जयश्रीचे काका संजय हिरे यांच्या तक्रारीनूसार जयश्री व अक्षय हे पूजेसाठी कथित भोंदू योगेश खैरनारकडे गेले होते. तेथे पूजाविधीनंतर वाद झाला. त्यामुळे योगेशने अक्षयच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून त्याचा खून केला. तर जयश्रीचाही ओढणीने गळा आवळून ठार मारले. 5 वर्षांपासून दरबार; साक्षात्काराच्या नावाखाली अघोरी पूजेची भोंदूगिरी स्वतःला ‘नवनाथ पंथीय’ म्हणवून घेत साक्षात्काराचा दावा करणाऱ्या योगेश खैरनारने गेल्या पाच वर्षांपासून साक्री तालुक्यातील उभरांडी शिवारात स्वतःचा बोगस आश्रम थाटला आहे. घरगुती अडचणी आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या लोकांसाठी तो दर गुरुवारी ‘दरबार’ भरवत असे. ‘हवन’ आणि ‘गुढ्या’ (भविष्य) सांगण्याच्या नावाखाली तो सुशिक्षित नागरिकांनाही जाळ्यात ओढायचा. अघोरी विद्या आणि चमत्कारांचा भुलभुलैया निर्माण करून त्याने परिसरातील अनेकांना आपल्या नादी लावले होते. केशरी रुमालाने फोडली वाचा जयश्रीचा मृतदेह आढळला तेथे एक केशरी रंगाचा रुमाल पोलिसांना आढळून आला. त्यावरून श्वान पथकाने थेट भोंदूबाबाच्या मठाचा मार्ग दाखवला. त्यानंतर पोलिसांनी भोंदूला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घटनेची कबुली दिली. त्याने अक्षयचा मृतदेह आश्रमाजवळ पुरल्याचे सांगितले. नंतर पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला. बनाव… तिला वाचवताना खून जयश्रीचा एक जण खून करत होता. मी तिला वाचवण्यसाठी गेलो. या झटापटीत त्या तरुणाचा आपल्या हातून खून झाला. तो मृतदेह उभांरडी येथील वनक्षेत्राजवळ दफन केला, असा बनाव भोंदू योगेश पोलिसांना सांगितला. मात्र,नंतर हा प्रकार स्वत: केल्याचे पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले. त्याने मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा वापर केला.
