नवव्या दिवशी ७४ कारवाया; ६६ लाखांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त
नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांची धडक मोहीम
नांदेड(प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळत असून पोलिसांनी विविध ठिकाणी धडक कारवाया करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक १ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या नवव्या दिवशी पोलिसांनी गुटखा विक्री, मटका-जुगार, अवैध दारू विक्री तसेच अवैध वाळू उपसा प्रकरणांमध्ये एकूण ७४ कारवाया केल्या असून आरोपींकडून तब्बल ६६ लाख १५ हजार ८५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दिवसभरात गुटखा विक्रीसंदर्भात तीन कारवाया केल्या. या कारवाईत आरोपींकडून ५२ हजार ४१८ रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्यासाठी दहा वर्षांपर्यंतच्या कारावासासह दंडाची तरतूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याशिवाय मटका-जुगार खेळणाऱ्या व चालविणाऱ्या ४१ इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये २९ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ६ लाख १५ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्या ३७ इसमांविरुद्ध ३३ गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून ८ लाख ९७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी कठोर कारवाई करत दोन गुन्हे दाखल केले. या प्रकरणात २३ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच शस्त्र अधिनियम व इतर विविध कायद्यांतर्गतही कारवाया करण्यात आल्या असून संपूर्ण मोहिमेदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसायांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने खबर ही विशेष हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी अवैध व्यवसायांची माहिती फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे (९१ ५० १०० १००) देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
Post Views: 106
