उस्मानगर पोलिसांची अवैध रेती उत्खननावर धडक कारवाई; दोन ट्रॅक्टर जप्त; १५ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
नांदेड (प्रतिनिधी)- उस्मानगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ऑपरेशन ट्रॅक अंतर्गत अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत दोन ट्रॅक्टरसह तब्बल १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी पहाटे ५.४० वाजताच्या सुमारास गोविंद पानठे मोहळे येथील शिवारात करण्यात आली.
पोलीस उप अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलेश्वर यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. यावेळी अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले. या कारवाईत एकूण ५ ब्रास रेतीसह दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालामध्ये एका ट्रॅक्टरची किंमत १५ लाख रुपये तर रेतीची किंमत २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस ठाणे उस्मानगर येथे गुन्हा क्रमांक ९३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३(५) तसेच सहकलम ४, २१ गौण खनिज अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लोकेश शिवाजी हंबर्डे,(रा. वाका ता. लोहा), माधव शिवाजी वाडवले (रा. कापसी ता. लोहा) व उत्तम बाबा ढगे (रा.येळी ता.लोहा) या रोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलेश्वर, पोलीस उप निरीक्षक गजानन गाडेकर,पोलीस अंमलदार सय्य्यद मकदूम सय्यद महेबूब साब, चिंचोरे, कल्लेवार,तुकाराम जुन्ने व माधव पवार यांनी पार पाडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
.
