15 मेपर्यंत स्व-गणना करावी; सीईओ सत्यम गांधींचे आदेश:कर्मचाऱ्यांना डिजिटल स्व-गणना सक्तीची; प्रमुखावर जबाबदारी
![]()
जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यात होणाऱ्या घरयादी व घरगणना (एचएलओ) प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आता कंबर कसली आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी डिजिटल स्व-गणनेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या स्वाक्षरीने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःची गणना अनिवार्यपणे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या परिपत्रकानुसार, १ ते १५ मे या कालावधीत शासनाच्या अधिकृत पोर्टलवर डिजिटल पद्धतीने स्व-गणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी आणि विशेषतः कर्मचाऱ्यांनी शासनाच्या https://se.census.go v.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती नोंदवावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या प्रक्रियेत विचारण्यात येणाऱ्या ३३ प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन नागरिक स्वतःची माहिती ऑनलाइन भरू शकणार आहेत. या आधुनिक पद्धतीमुळे माहिती भरण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.सीईओ सत्यम गांधी यांनी स्पष्ट केले आहे की, जिल्हा परिषद मुख्यालय, सर्व पंचायत समित्या, तालुका कार्यालये, शिक्षक संवर्ग, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच पंचायत समिती कार्यक्षेत्रातील निमशासकीय कर्मचारी, डाटा ऑपरेटर आणि युवा प्रशिक्षणार्थी या सर्वांनी ही गणना करणे बंधनकारक आहे. जनगणना ही केवळ एक शासकीय प्रक्रिया नसून ती देशाच्या भविष्यातील विकास आराखड्याचा पाया आहे. त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून सर्वांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून ती यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी पत्राद्वारे केले आहे. सर्व कार्यालय प्रमुखांना त्यांच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांनी स्व-गणना पूर्ण केल्याची खातरजमा करण्याचे आदेश दिले आहेत. कर्मचाऱ्यांनी स्व-गणनेनंतर प्राप्त होणारे ‘डिजिटल प्रमाणपत्र’ कार्यालय प्रमुखांकडे जमा करणे आवश्यक आहे. प्रमुखांनी ही संवर्गनिहाय माहिती विहित नमुन्यात संकलित करून १५ मे पूर्वी ई-मेलद्वारे प्रशासनाकडे सादर करायची आहे. या प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सर्व कार्यालय प्रमुखांना त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्व-गणना पूर्ण केल्यानंतर स्व-गणनेचे डिजिटल प्रमाणपत्राची खातरजमा करून संवर्गनिहाय माहिती विहित नमुन्यात सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. संबंधित माहिती १५ मे पूर्वी ई-मेलद्वारे पाठविण्याचे आदेश परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत. कार्यालयप्रमुख जबाबदार
