NCP Sharad Pawar Group Spokesperson Vikas Lawande Ink Attack
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज हभप संग्राम भंडारे व काही गोरक्षकांनी आज सकाळी 10 च्या सुमारास शाईफेक करण्यात आली. विकास लवांडे गत काही दिवसांपासून वारकरी संप्रदायातील घुसखोरांचा मुद्दा लावून धरला होता. त
.
विकास लवांडे आळंदी मातोबा तालुका हवेली येथे प्रवचनासाठी गेले होते. तेथील प्रवचन संपल्यानंतर सकाळी 10 वा. ते परत येत होते. रस्त्यात 3 गाड्यांमधून आलेल्या संग्राम भंडारे व 10-15 गोरक्षकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर शाईफेक केली. त्यांना धक्काबुक्की केली. विकास लवांडे यांनी हल्लेखोरांनी आपल्याला पिस्तुल दाखवत जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर ते पळून गेले. या घटनेनंतर लवांडे यांनी तत्काळ लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात जाऊन संग्राम भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पुणे पोलिस आयुक्तांनी माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त केल्याशिवाय आपण पोलिस स्टेशन सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.
विकास लवांडे यांनी काय सांगितले?
विकास लवांडे यांनी हा हल्ला झाल्यानंतर एक व्हिडीओ जारी करत घडलेला घटनाक्रम सांगितला आहे. त्यांनी व्हिडीओत म्हटलं की, “आज सकाळी माझे आळंदी येथे दशक्रियेच्या कार्यक्रमानिमित्त प्रवचन होते. ते प्रवचन संपल्यानंतर मी पुण्याच्या दिशेने निघालो. वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि 10-15 गोरक्षक होते. त्यांच्या दोन – तीन गाड्या होत्या. या सगळ्या गुंडांनी मला निर्जनस्थळी अडवले. मला गाडीतून खाली उतरवून माझ्या अंगावर शाईच्या दोन-तीन बाटल्या ओतल्या. मला धक्काबुक्की केली. त्यातील दोघांकडे बंदुका होत्या. ते मला जीवे मारण्याची धमकी देत होते.
विकास लवांडे पिस्तुल लावण्याच्या पात्रतेचा नाही – संग्राम भंडारे
संग्राम भंडारे यांनी या प्रकरणी आपली बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, विकास लवांडे हे गत अनेक दिवसांपासून ज्या गुरुवर्यांनी आम्हाला हिंदू धर्माची शिकवण दिली, आम्हाला लहानाचे मोठे केले, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करत होते. ते आमच्या गुरुंना घुसखोर, धर्मांध म्हणत असतील तर ते आम्ही कसे सहन करणार? त्यांनी आमच्यासारख्यांना भिडायचे असेल, तर भिडावे. पण आम्ही आमच्या गुरुंवरील टीका सहन करणार नाही.
आता ते आच्यावर खोटे आरोप करत आहेत. पिस्तुल दाखवल्याचे सांगत आहेत. पण पिस्तुल लावण्याएवढे ते मोठे नाहीत. आम्ही चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट आहोत. आम्ही शिवछत्रपतींचे मावळे व ज्ञानोबा-माऊलींचे वारकरी आहोत. विकास लवांडे यांनी भविष्यात पुन्हा आमच्या गुरुवर्यांचा अवमान केला, तर आम्ही त्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
वारकरी संप्रदायातील घुसखोरांचा नेमका वाद काय?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका लेखाद्वारे वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, वारकरी संप्रदायातील सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी होत आहे. समतेचा आणि प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या वारकरी चळवळीत अशा विचारांची वाढ होणे ही चिंताजनक बाब आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही काही पुरोगामी विचार मांडणाऱ्या व्यक्तींची नोंद घेण्याचे काम सुरू केले आहे. सध्या सुमारे 40 जण असे दिसून येतात की जे कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून प्रगत विचार मांडत आहेत. अशा लोकांची संख्या वाढणे आवश्यक असून, समाजप्रबोधनासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
याचवेळी शरद पवार यांनी वारकरी चळवळीत महिलांचा अभाव असल्याची खंतही व्यक्त केली होती. प्रबोधनाच्या या प्रवाहात महिलांचा सहभाग फारसा दिसत नाही. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. समाजातील सर्व घटकांचा यात समतोल सहभाग असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले होते. शरद पवारांच्या या भूमिकेनंतर विकास लवांडे यांनी अशा लोकांची कथित पोलखोल करत आहेत. त्यांनी या प्रकरणी कथित घुसखोरांची एक यादीही जाहीर केली होती. त्यात चैतन्य महाराज देगलूरकर यांच्यासह अनेकांची नावे होती.
विकास लवांडेंनी कुणा-कुणाला घुसखोर म्हटले होते?
विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात कथित घुसखोरी करणाऱ्या लोकांची एक यादी प्रसिद्ध केली होती. त्यात किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरी, गौतम खट्टर, संभाजी भिडे गुरूजी, संग्राम भंडारे, तुषार भोसले, अक्षय भोसले, प्रकाश जवंजाळ, एकनाथ सदगीर, ज्ञानेश्वर जळकीकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन, संजय पाचपोर, भास्करगिरी महाराज, संजय नाना धोंडगे, राणा वासकर, चंद्रशेखर देगलूरकर, उदबोध पैठणकर, किशोर शिवणीकर, रामगिरी महाराज, शाम राठोड, निरंजन कोटेकर या कीर्तनकारांचा समावेश होता. हे सर्वजण वारकरी संप्रदायात घुसखोरी करून वारकरी संप्रदायाची सामाजिक समतेची वीण उसवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
ज्ञानोबा-तुकोबांनाही मनुवादी वृत्तीने असेच छळले – रोहित पवार
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरतावाद्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याचाच राग मनात धरून आज विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाई ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! असे हल्ले हे काही नवीन नाहीत.
यापूर्वीही ज्ञानोबा-तुकोबांनाही मनुवादी वृत्तीने असंच छळलं होतं, त्यामुळं या गुंडांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाहीत. या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारने तत्काळ मुसक्या आवळाव्यात आणि हा हल्ला करताना लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं त्यांना तातडीने पोलीस संरक्षणही पुरवावं, अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानेच केलेला हा हल्ला आहे, असे आम्ही समजू. यापुढं लवांडे यांना काही झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, याची सरकारने नोंद घ्यावी, असे ते म्हणालेत.

दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही तर पोलिस स्टेशनला जाणार
रोहित पवार यांनी या प्रकरणी दुपारपर्यंत एफआयआर दाखल झाला नाही तर आपण स्वतः पोलिस स्टेशनला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, विकास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज दुपारपर्यंत FIR दाखल झाला नाही तर संध्याकाळी मी स्वतः पोलीस स्टेशनला जाणार. थोर संतांनी दाखवलेला बंधुभावाचा आणि शिव – फुले – शाहू – आंबेडकरांचा विचार हाच खरा महाराष्ट्र धर्म असून कोणत्याही कट्टरवाद्यांना, गुंडापुंडांना आणि शिव्या देणाऱ्या मनुवाद्यांना हा विचार आम्ही पुसू देणार नाही. ‘‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, असे ते जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा दाखला देत म्हणालेत.
हल्लेखोरांना कुणाचा वरदहस्त हे उघड – सुप्रिया सुळे
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विकास लवांडेंवर हल्ला करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त आहे हे उघड आहे अशी भावना व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार (@NCPspeaks) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यानच्या प्रवासात हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्या गुंडांकडे हत्यारे देखील होती. या हल्ल्यात विकास लवांडे यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. परंतु ही घटना अतिशय गंभीर असून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदविण्यात येत आहे.
भररस्त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे हे उघड आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील ही अतिशय गंभीर आणि तितकीच निराशाजनक बाब आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे, असे त्या म्हणाल्या.

हा हल्ला हिंस्र मनुवादी प्रवृत्तींना असलेल्या सत्तेच्या पाठबळाचे प्रतीक – वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणाले, एका बीजा केला नाश। मग भोगलें कणीस ।। कळे सकळां हा भाव। लहानथोरांवरी जीव ।। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीत शाईफेक झाल्याची, त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यानिमित्ताने वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या हिंस्र प्रवृत्तींचा काळा चेहरा समोर आला आहे. हा भ्याड हल्ला म्हणजे अशा हिंस्र मनुवादी प्रवृत्तींना असलेल्या सत्तेच्या पाठबळाचे प्रतीक आहे.
स्वतःला माऊलींचा भक्त म्हणवून घेणारा, परंतु प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांचा भक्त असलेल्या संग्राम भंडारे या भोंदू बाबाने आपल्या कृत्यातून माऊलींच्या पवित्र भूमीला दूषित केले. विकास लवांडे यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमांवर आहेत, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या भ्याड हल्लेखोरांना अटक करावी अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणालेत.
हा कुठला वारकरी धर्म आणि कुठली नितीमत्ता? – अमोल मिटकरी
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी कांग्रेस (श.पवार साहेबांच्या)पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदी येथे एकट्यात गाठून स्वतःला वारकरी म्हणवून घेणाऱ्या झुंडशाहीने ज्याप्रकारे गुंड शाही केली ती पाहता हा कुठला वारकरी धर्म आणि कुठली नितीमत्ता? “कुण्याही जीवाचा न घडो मत्सर” व “जो जे वांछील तो ते लाहो” असे वैश्विक पसायदान मागणारे “तुकोबा ज्ञानोबा” अशा धर्माच्या नावावर गुंडगिरी करणाऱ्या कपाळ करंट्याना मेल्यावरही कळणार नाहीत. निषेध, असे त्यांनी म्हटले आहे.

अत्यंत निंदनीय अन् कलंक लावणारा हल्ला – रोहित पाटील
शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकासजी लवांडे यांच्यावर झालेला शाईफेकीचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलंक लावणारा आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, पण अशा प्रकारे वैयक्तिक हल्ला करणे ही भ्याडवृत्ती आहे. संग्राम बापू, राजकारणात मतभेद असू शकतात, पण ही वारकरी संप्रदायाची शिकवण नक्कीच नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो, असे ते म्हणालेत.

संग्रामबापूंनी केलेली शाईफेक अगदी योग्यच:ही शाईफेक नसून दुखावलेल्या भावनांचा उद्रेक, धर्माविरोधात बोलायला यांना कोण प्रवृत्त करते?-संग्राम जगताप
ज्या लोकांनी धर्मांकरता पूर्ण जीवन समर्पित केले. भगव्या ध्वजा करता ज्यांनी स्वत:चे जीवन समर्पित केले आहे त्याच्यावर कुठेच नसणाऱ्या पक्षाचे लोकं उठतात आणि टीका करतात, आणि घुसखोर ‘हभप’ म्हणत एक यादी वाचून दाखवतात यामुळे हभप संग्रामबापू भंडारे यांनी त्यांच्यावर जी शाईफेक केली ती अगदी योग्य आहे, आम्ही त्यांचे समर्थन करतो, त्यांनी योग्य भूमिका घेतली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
