जनतेच्या शौचालयावर भाजपचं कार्यालय?:मुंबईतील धक्कादायक प्रकारावर ठाकरे गट आक्रमक; BMC च्या जागेवर भाजपचा कब्जा?
![]()
सार्वजनिक शौचालयासाठी राखीव असलेल्या जागेवर भाजपचे सुसज्ज कार्यालय आणि प्रचार साहित्याचे गोदाम उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. बोरीवलीतील अक्सर गाव परिसरात हा प्रकार घडल्याचा दावा करत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप आणि मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिराती आणि दुसरीकडे नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर राजकीय कब्जा, अशी टीका करत त्यांनी प्रशासनाला थेट सवाल केला आहे. अखिल चित्रे यांनी केलेल्या आरोपानुसार, मुंबई महानगरपालिकेने या भागात नागरिकांसाठी 18 सार्वजनिक शौचालयांची योजना आखली होती. मात्र त्यापैकी 10 शौचालये प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या जागेवर सामान्य नागरिकांसाठी सुविधा उभारल्या जाणे अपेक्षित होते, त्या जागेवर आता भाजपचे कार्यालय आणि प्रचार साहित्य ठेवण्यासाठी हॉल तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील नागरिकांना शौचालयाच्या सुविधेसाठी त्रास सहन करावा लागत असल्याचेही चित्रे यांनी म्हटले आहे. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना शौचालयासाठी अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या गरजांपेक्षा पक्षाचे बॅनर्स आणि राजकीय कार्यालये महत्त्वाची वाटत आहेत, असा घणाघात अखिल चित्रे यांनी केला. सार्वजनिक सुविधांवर राजकीय कब्जा करणे म्हणजे मुंबईकरांचा अपमान असल्याचेही त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले. या संदर्भात त्यांनी मुंबई महानगरपालिका, भाजप मुंबई आणि संबंधित पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियावर टॅग करत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे. अखिल चित्रे हे सोशल मीडियावर सक्रिय राहून सातत्याने विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडत असतात. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर ते सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. देश, राज्य आणि मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता असताना अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. याआधीही अखिल चित्रे यांनी मासळी विक्रेत्यांच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. मासळी बाजारात मासे कापून विकण्यावर कथित निर्बंध आणण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शवला होता. कोळी समाजाच्या उदरनिर्वाहावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मुंबईचे खरे मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांना कोणी रोखू शकत नाही, असे म्हणत त्यांनी महापालिकेला खुले आव्हानही दिले होते. शौचालयाच्या जागेवर पक्ष कार्यालय उभारल्याचा आरोप दरम्यान, बोरीवलीतील या कथित प्रकारामुळे आता राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. सार्वजनिक शौचालयाच्या जागेवर पक्ष कार्यालय उभारल्याचा आरोप कितपत खरा आहे, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी या प्रकरणावरून ठाकरे गटाने भाजपला थेट लक्ष्य केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
