'विवेकयात्री' ग्रंथाचे प्रकाशन:डॉ. गणेश देवी यांनी विवेकवादाची मशाल तेवत ठेवण्याचे केले आवाहन
![]()
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी विवेकवादाची मशाल तेवत ठेवण्याचे आवाहन केले. राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘विवेकयात्री’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. विवेकवादाची शिळा शिखरावर नेणाऱ्या विवेकवादी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, नव्या उमेदीने काम करत राहण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. प्रसिद्ध लेखक डॉ. अभिजित वैद्य यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते झाले. पुणे येथील एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या मुख्य सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर लेखक डॉ. अभिजित वैद्य आणि राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे उपस्थित होते. डॉ. गणेश देवी यांनी विवेकवादाचे विविध स्तर स्पष्ट केले. विवेकवाद सदैव प्रवाही असून काळानुरूप त्याचे स्वरूप बदलत जाते, असे ते म्हणाले. ‘विवेकयात्री’ हे पुस्तक विवेकवादाचा विश्वकोश नसून, ते पाश्चात्त्य आणि पौर्वात्य तत्त्वज्ञांच्या जीवनातून विश्वाची, निसर्गाची आणि मानवी मनाची रहस्ये शोधण्याचा प्रयत्न करते, असे त्यांनी नमूद केले. डॉ. राजा दीक्षित यांनी यावेळी बोलताना सांगितले की, जग, भारत आणि महाराष्ट्र अविवेकाने ग्रासलेले असताना, अविवेकाची काजळी नष्ट करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. हा ग्रंथ विवेकवादाचा दीप उजळून अविवेकाचा अंधार दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्राचीन समाजात विवेकाची गुढी रोवली गेली असताना, आधुनिक काळात विवेकवाद ढासळलेला दिसतो, असेही ते म्हणाले. ग्रंथाचे लेखक डॉ. अभिजित वैद्य यांनी विवेकाच्या किल्ल्यांचे बुरूज ढासळत असल्याची चिंता व्यक्त केली. जगणे नकोसे झालेल्या सामान्य लोकांसाठी ‘विवेकयात्री’ हे पुस्तक पथदर्शक ठरू शकते, कारण जगभरातील विवेकवादी विचारवंतांनी नेहमीच सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जगात जन्मतःच दुःखी असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा वातावरणात विवेक नसणारे राज्यकर्ते सिंहासनावर बसल्यास भारतात गाझापट्टी आणि युक्रेनसारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
