राज्यात कुठे कडाक्याचे ऊन तर कुठे अवकाळीचा फटका:रायगडमध्ये वीज पडून बालकाचा मृत्यू; पुणे-बंगळुरू महामार्गाला नदीचे स्वरूप
![]()
राज्यात सध्या हवामानाचा लहरीपणा पाहायला मिळत असून एका बाजूला तीव्र उष्णतेमुळे तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे, तर दुसरीकडे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील उंब्रज परिसरात नदीचे स्वरूप मिळाले आहे. या अवेळी आलेल्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून बागांचे मोठे नुकसान झाले आहे; दरम्यान, रायगड जिल्ह्यात या पावसामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्याला झोडपणाऱ्या अवकाळी पावसाने तळा तालुक्यात एका निष्पाप मुलाचा बळी घेतला आहे. तळा तालुक्यातील कर्नाळा फळशेत गावात राहणाऱ्या वेदांत जनार्दन भोसले (वय 14) या मुलाचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक पाऊस सुरू झाल्याने घराबाहेरील सामानाची आवराआवर करत असताना ही वीज कोसळली, ज्यात वेदांतला आपले प्राण गमवावे लागले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. संगमेश्वरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारी कडाक्याचे ऊन आणि सायंकाळी मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह येणाऱ्या या पावसामुळे संगमेश्वर बाजारपेठेतील रस्ते आणि नाले तुडुंब भरले असून, नागरिक व व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. या लहरी हवामानाचा थेट फटका आंबा पिकाला बसला असून बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे उष्णता आणि पावसाच्या या मिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे-बंगळुरू महामार्ग परिसरात नदीचे स्वरूप सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटण तालुक्याला आज अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावरील उंब्रज परिसराला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून, या जलमय परिस्थितीमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक लहान वाहने अर्धी पाण्यात बुडाली असून महामार्गावर सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत; विशेषतः कराड, उंब्रज आणि कासेगाव परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने केलेल्या चुकांचा आणि नियोजनाअभावाचा फटका वाहनधारकांना बसत असल्याचे या भीषण दृश्यावरून स्पष्ट झाले आहे. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी भंडारा जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, विशेषतः लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील आठवडी बाजारात आलेल्या भाजी विक्रेत्यांची आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे मका आणि भात पिकांची मळणी करून वाळत ठेवलेले धान्य ओले झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला असून, शेती कामांसह सर्वसामान्य नागरिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्याला अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याने झोडपून काढले असून, यामुळे आंबा, काजू आणि केळीच्या बागायतींचे अतोनात नुकसान झाले आहे. यंदा आंब्याचे उत्पादन आधीच केवळ दहा टक्क्यांवर असताना, या वादळामुळे काढणीवर आलेली फळे गळून पडली असून अनेक झाडेही उन्मळून पडली आहेत. या अनपेक्षित नैसर्गिक संकटामुळे बागायतदारांच्या तोंडचा घास हिरावला गेला असून त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
