नाट्यसंस्कारच्या ‘जीर्णोद्धार’ची गौरवशाली पन्नाशी पूर्ण:कलावंत तसेच पालकांचा कौतुक सोहळा
![]()
नाट्यसंस्कार कला अकादमी निर्मित ‘जीर्णोद्धार’ या बालनाट्याचा ५०वा प्रयोग आणि त्यातील कलावंत तसेच त्यांच्या पालकांचा कौतुक सोहळा बुधवार, १३ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. पुणे येथील भरत नाट्य मंदिरात सायंकाळी ६ वाजता हा विशेष प्रयोग पार पडेल. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी ९ मे रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पालक प्रतिनिधी आरती दाते, प्रसाद कुलकर्णी आणि पुष्कर देशपांडे उपस्थित होते. ‘जीर्णोद्धार’ या बालनाट्याचे लेखन संध्या कुलकर्णी यांनी केले असून, दिग्दर्शन प्रसाद कुलकर्णी यांचे आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग २४ मार्च २०२२ रोजी भरत नाट्य मंदिरातच झाला होता. ५०व्या प्रयोगासाठी सुप्रसिद्ध अभिनेता अथर्व कर्वे आणि संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बालनाट्याने राज्य नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रावर प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच, अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य आणि प्रकाशयोजनेसाठीही अनेक पारितोषिके मिळवली आहेत. शर्व दाते, दृष्टी मोरे, अक्षरा जाधव, सई भोसले, अर्चिस थत्ते या कलावंतांनी अभिनयाची पारितोषिके जिंकली आहेत. संध्या कुलकर्णी यांना लेखनासाठी, प्रसाद कुलकर्णी यांना दिग्दर्शनासाठी तर पुष्कर देशपांडे यांना नेपथ्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. या एकांकिकेला आतापर्यंत एकूण ५६ पारितोषिके मिळाली आहेत. ‘जीर्णोद्धार’चे प्रयोग एन. डी. स्टुडिओ कर्जत, मुंबई, चेंबूर, वाशी, कल्याण, डोंबिवली अहिल्यानगर, सोमनाथ प्रकल्प चंद्रपूर, आनंदवन प्रकल्प वरोरा, संभाजीनगर यांसह महाराष्ट्राबाहेर बेळगाव येथेही झाले आहेत. कलावंत आणि तंत्रज्ञांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच पालकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रसिकांना हा प्रयोग पाहण्यासाठी मुक्त प्रवेश असेल.
