विकास लवांडे यांच्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत:सुनील माने यांचा आरोप; नितेश राणेंकडून हल्ल्याचे समर्थन

0
c39f8b6e-a4e9-4023-a0f5-64fd8c2b0a05_1778331064479.jpg




राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज पुण्यात हल्ला झाला. या हल्ल्यामागे सरकारचा हात असल्याचा आरोप पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी केला आहे. राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या हल्ल्याचे समर्थन केल्याने महाराष्ट्राला लाज वाटायला हवी, असेही माने म्हणाले. माने यांनी सांगितले की, विकास लवांडे यांच्यावरील हल्ला निषेधार्ह आहे. हल्ला करणारा संग्राम भंडारे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याचे सिद्ध झाले आहे. लवांडे यांच्या म्हणण्यानुसार, दोन पिस्तुलधारी व्यक्ती त्यांच्यासोबत होत्या आणि त्यांनी लवांडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी माने यांनी केली. लवांडे यांनी काही ‘भोंदू, मनुवादी, हभप’ लोकांची यादी जाहीर केली होती, ज्यामुळे हल्लेखोर संतप्त झाले असावे, असे लवांडे यांचे म्हणणे आहे. या संदर्भात माने यांनी प्रश्न उपस्थित केला की, मनुवादाचे समर्थन करणे किंवा शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिबा फुले यांच्याबद्दल विकृतपणे बोलणे वारकरी संप्रदायाला मान्य आहे का? ‘हभप’ म्हणून घेणारे लोक याला पात्र आहेत का? लवांडे यांनी जाहीर केलेल्या यादीला हीच पार्श्वभूमी होती, त्यामुळे हल्लेखोर खरोखरच भोंदू आणि वारकरी संप्रदायातील घुसखोर आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. अशा लोकांवर कारवाई करण्याऐवजी नितेश राणे यांच्यासारखे घटनात्मक पदावर असलेले लोक त्यांचे समर्थन करतात, हे महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि पुरोगामी राज्यासाठी लज्जास्पद आहे. मुख्यमंत्र्यांनी राणे यांना अनेकदा समज दिली असली तरी, ते सुधारत नाहीत, याचा अर्थ ती समज निरुपयोगी आहे. यावर कारवाई न झाल्यास आम्हाला जाहीरपणे भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही सुनील माने यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *