सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन:केंद्र सरकारचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद
![]()
विकसित भारतासाठी शेतकरीही विकसित व्हायला हवा, यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे सौर कृषिपंपांसह विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांच्या लाभार्थ्यांनी इतर शेतकऱ्यांनाही सौर पंपांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन केंद्र सरकारच्या नवीन और नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी (भाप्रसे) यांनी केले. शनिवारी (9 मे) महापारेषणच्या सभागृहात पीएम-कुसुम बी व मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या लाभार्थ्यांशी सारंगी यांनी संवाद साधला. यावेळी राज्याचे नवीन और नवीकरणीय ऊर्जा, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, नवीन व नवीकरणीय मंत्रालयाचे सहसचिव जेव्हीएन सुब्रमण्यम (भाप्रसे), विभागीय आयुक्त जी. श्रीकांत (भाप्रसे), नवीन और नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या संचालक श्रीमती सुमन चंद्रा (भाप्रसे), जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. (भाप्रसे), महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने (भाप्रसे), कार्यकारी संचालक (वितरण) धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) पंकज तगलपल्लेवार, छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिव सारंगी, सहसचिव सुब्रहण्यम, संचालक श्रीमती चंद्रा यांनी लाभार्थ्यांशी सौरपंप बसवण्याआधीची व नंतरची स्थिती, पीक पद्धती व उत्पादनात झालेले बदल याविषयी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यातील लाभार्थी अंकुश बर्गे, वैशाली लहाने, बळीराम लहाने, सचिन जोशी, गजानन शिंदे, विजय जावळे यांनी सौर ऊर्जेमुळे आयुष्यात परिवर्तन झाल्याचे सांगितले. आधी वीज नसल्याने डिझेलपंप लावून पिकांना पाणी द्यावे लागायचे. त्यासाठी दिवसाकाठी 700 ते 800 रुपये डिझेलला खर्च व्हायचे. मात्र शासनाकडून अनुदानावर सौर कृषिपंप मिळाल्याने डिझेलचा खर्च वाचला आहे. दिवसा खात्रीशीर वीज मिळत असल्याने नगदी पिके घेतली आणि उत्पन्नात वाढ झाली, असे लाभार्थ्यांनी सांगितले. व्यवसायाने विद्युत अभियंता असलेले सचिन जोशी यांनी सौरपंप बसवल्यानंतर शेतीत भरघोस उत्पादन होत असल्याचे सांगितले. आधी कोरडवाहू शेती होती. तेव्हा एकच पिक होते. मात्र सौरपंप बसवल्यानंतर भाजीपाला, फळे लागवड केल्याने उत्पन्न वाढले. या योजनेचा लाभार्थी म्हणून राष्ट्रपती भवनात जाण्याचीही संधी मिळाली, असे बळीराम लहाने यांनी सांगितले. सौर पंप योजनेत ग्राहकांना सुलभरीत्या लाभ मिळवा यासाठी महावितरणतर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी दिली. अर्ज करण्यापासून ते पंप बसवण्यापर्यंत मानवी हस्तक्षेप टाळून महावितरणकडून पारदर्शक पद्धतीने सर्व प्रक्रिया होते. त्यामुळे महाराष्ट्रात या योजनेला यश मिळाल्याचे सरग यांनी सांगितले. यावेळी सचिव संतोष कुमार सारंगी म्हणाले, कुसुम बी व मागेल त्याला कृषी पंप योजनेचा लाभ झाल्याचे जेव्हा शेतकरी सांगातात, तेव्हा या योजनेचा उद्देश सफल झाल्याचे समाधान वाटते. स्वातंत्र्यानंतर शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आल्या. मात्र त्या सर्वांत फायदेशीर ही सौर कृषी पंप योजना आहे. कारण याचा शेतकऱ्यांना थेट लाभ होत आहे. ज्या शेतकऱ्यांना पंप मिळाल्यानंतर त्यांचे जीवनमान सुधारले, त्यांनी इतर शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेण्यास प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात सौर पंप योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल सारंगी यांनी महावितरणचे अभिनंदन केले. केंद्र सरकारतर्फे आता पीएम-कुसुमअंतर्गत ॲग्री फोटो व्होल्टाइक योजना राबवण्यात येणार आहे. त्यात सौर पॅनल शेतात विशिष्ट उंचीवर बसवून पॅनलखालील भूभागही पिकांच्या लागवडीसाठी वापरता येणार आहे. पॅनलच्या सावलीत भाजीपाला चांगला पिकवता येतो. देशात काही ठिकाणी असे पॅनल बसवण्यात आल्याचे सचिव सारंगी यांनी सांगितले. कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी प्रास्ताविक केले. ॲड.युगंधरा नामदे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी आभार मानले. अधीक्षक अभियंता संदीप दरवडे, प्रेमसिंग राजपूत यांनी स्वागत केले. सौर कृषी वाहिनी प्रकल्प व सौरपंपाची पाहणी नवीन और नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी सिल्लोड तालुक्यातील वरखेडी येथील 6 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाचीही पाहणी केली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रकल्पातून आळंद उपकेंद्रावरील 3 हजार 148 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जातो. याबाबत सारंगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या पथकाने फुलंब्री तालुक्यातील उमरावती येथील शेतकरी आरिफ हुसेन सय्यद यांच्या शेतातील सौर पंपाची पाहणी केली. 5 एचपी क्षमतेच्या पंपामुळे शेती सिंचन सोयीचे झाल्याचे यावेळी शेतकऱ्याने सांगितले.
