नसरापूरचा नराधम:नसरापूरच्या नराधमाने ज्याच्यासमोर खुनाची कबुली दिली तो साक्षीदार पोलिसांत हजर
![]()
नसरापूर येथे १ मे रोजी ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळेने ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिचा खून केला. या घटनेनंतर लोकांनी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र, पोलिस कोठडीत तो तोंड उघडत नव्हता. कोर्टासमोरही त्याने निर्लज्जपणे असे सांगितले की, किरकोळ वादातून मला या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस साक्षी-पुरावे गोळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून नराधम कांबळेने खुनाची कबुली नसरापूर गावातील एका व्यक्तीला दिली होती. माझी चूक झाल्याचे सांगत, मी मुलीला मारले असल्याचे त्याने संबंधित व्यक्तीला सांगितले. या साक्षीदाराने ही अत्यंत महत्त्वाची पोलिसांना दिली आहे. दरम्यान, नराधमाच्या पोलिस कोठडीत १२ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, आरोपी कोठडीत चौकशीस सहकार्य करत नाही. तो विकृत स्वभावाचा असल्याचे दिसते. दरम्यान, त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी सांगितले की, चिमुकलीवर अत्याचारानंतर आरोपी खांद्यावर एक गाठोडे घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. ते गाठोडे शोधणे बाकी आहे. तसेच आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जात असताना त्याच्या हातात शेवपुडा देखील दिसून आला आहे. ती शेव नेमक्या कोणत्या दुकानातून घेतली याबाबत तपास करणे आहे. चिमुकलीच्या शरीरावरील जखमा कोणत्या हत्याराने करण्यात आल्या, याचा तपास बाकी असल्यामुळे पोलिस कोठडी मिळावी. नराधमाची कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी पुणे | भोर तालुक्यातील नसरापूर येथील बालिका अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याच्या पोलिस कोठडीत १२ मेपर्यंत वाढ केली. हत्येचे हत्यार शोधणे, गाठोड्याचे गूढ उकलणे यासाठी वाढीव कोठडी मागितली.
