संबळाच्या ठेक्यात देवी-म्हसोबाची सोंगे काढून आखाडी उत्सवाची सांगता:चांदवडच्या आखाडी उत्सवात घडले लोकसंस्कृतीचे जिवंत दर्शन
![]()
येथील गाडगेबाबा चौक (बहादूरपुरा) येथे श्री संत गाडगेबाबा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित आखाडी (देवी उत्सव) उत्सवात उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेली देवीमाता व म्हसोबा महाराज ही मानाची सोंगे काढून शुक्रवारी (दि. ८) पहाटे आखाडी उत्सवाची उत्साहात सांगता झाली
.
ऐतिहासीक ओळख असलेल्या चांदवड शहराने धार्मिक उत्सवांची परंपरा कायम ठेवत लोकसंस्कृती जोपासली आहे. शहरातील गाडगेबाबा चौक येथे श्री संत गाडगेबाबा मित्र मंडळाच्या वतीने तीन वर्षांनंतर आयोजित आखाडी (देवी) उत्सवास रविवारपासून (दि. ३) प्रारंभ झाला होता. सलग पाच दिवस सुरू असलेल्या या उत्सवात पहिल्या दिवशी गणपती-शारदाचे पहिले सोंग काढून प्रारंभ करण्यात आला. मनोरंजनासाठी धुळे येथील रवी निकम यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या उत्सवात गणपती-शारदा, वीरभद्र, भीम-बकासुर, भस्मासूर-मोहिनी, कच्छ-मच्छ, कासव, बाळांतीणबाई, महादेव-पार्वती, एकादशी, इंद्रजीत, रावण, वेताळ महाराज, भैरोबा, नरसिंह महाराज, खंडेराव महाराज ही सोंगे नाचविण्यात आली. शुक्रवारी (दि. ८) पहाटे उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेली देवीमाता व म्हसोबा महाराज यांची सोंगे काढण्यात आली.
यावेळी देवीमाता-म्हसोबा महाराज भेटीचा सोहळा पाहण्यासाठी आखाडीप्रेमी व महिला, पुरुष, अबालवृद्धांनी प्रचंड गर्दी केली होती. देवीमाता व म्हसोबा महाराज यांच्या भेटीच्या सोहळ्यानंतर देवी मातेची मिरवणूक काढण्यात आली. देवीच्या सोंगाचा मान यश बोटवे तर म्हसोबा महाराज यांच्या सोंगाचा मान साहिल उगले यांना मिळाला. भालदार-चोपदारची भुमिका सुरेश बागूल व दिलीप पवार यांनी पार पाडली. उत्सव यशस्वितेसाठी उत्सव समिती पंच कमिटीचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले. आखाडी उत्सवासाठी सोंगांचा लिलाव करण्यात येतो. जास्तीत जास्त बोली बोलणाऱ्यांना सोंगे नाचविण्याचा मान दिला जातो. हजारो रुपये खर्च करुन उत्सवात सोंगे नाचविली जातात. आखाडी उत्सवात सोंग नाचविताना ‘पावित्र्य’ आणि ‘पवित्रा’ यांना विशेष महत्व दिले जाते. पूजा, नैवेद्य, उपवास करून सोंगांचे पावित्र्य राखण्यात येते तर संबळच्या चालीवर विशिष्ट ठेक्यावर नाचण्याच्या कलेला पवित्रा म्हटले जाते. काही घराण्यांकडून दरवर्षी विशिष्ट सोंगे नाचविली जातात. सोंग नाचविताना तरुण पिढीला तसेच बालकांना ज्येष्ठांकडून पवित्र्यावर सोंग नाचविण्याचा सल्ला देण्यात येतो.
