शासन आपल्या दारी:महसुली समस्या‎एका छताखाली सोडविण्याचा उपक्रम‎, खुलताबादला प्रलंबित प्रकरणांचा निपटारा

0
240_177823619469fdbb2292966_khultavad1111.jpg




खुलताबाद शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, तसेच महसुली प्रश्नांचे एका छताखाली तात्काळ निराकरण व्हावे, या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी केले. शासन आपल्या दारी या संकल्पनेतून नागरिकांना विविध शासकीय सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देण्याचा हा प्रभावी उपक्रम असल्याचेही त्यांनी नमूद केले. खुलताबाद तहसील कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १’ मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरास छत्रपती संभाजीनगर विभागाचे अपर आयुक्त परदेशी, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, मुख्यधिकारी समीर शेख, नगराध्यक्ष आमेर पटेल, उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, भद्रा मारुती संस्थान अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, पंचायत समिती सभापती सुनीताताई खंडागळे, उपसभापती मंदाबाई वाकडे, जिल्हा परिषद सदस्या रेखाताई चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिनेश अंभोरे, यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खुलताबाद तहसीलमधील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी. शिबिरात खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्याचे वितरण कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर तसेच विविध शेती उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. महसूल विभागासोबतच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. जमीन नोंदी, सातबारा दुरुस्ती, नामांतरण, उत्पन्न व निवासी दाखले, जातीचे दाखले, ई-पीक पाहणी, जमीन मोजणी आदी विषयांवर नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. आयोजनासाठी मंडळ अधिकारी विजय चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी बंडू आव्हाड, नगरसेवक परसराम बारगळ, नगरसेवक वाजेद शेख नगरसेवक तौसीफ शेख आदींनी परिश्रम घेतले. शिबिरादरम्यान महसूल विभागाकडील विविध प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात आला. यामध्ये ६३ फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर ८७ खातेदारांना डिजिटल सातबारे वितरित करण्यात आले. तसेच ६६ खातेदारांना ८-अ उतारे देण्यात आले. ५१ नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले असून ३२ वारस नोंदींचा निपटारा करण्यात आला. भोगवटदार वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रूपांतर असलेले एक प्रकरण निकाली काढण्यात आले. याशिवाय तीन रस्ते खुले करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. यावेळी तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती होती. नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणाचा तत्काळ निपटारा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed