दोन चौकशी समित्या:त्र्यंबक व्हीआयपी दर्शन पास घोटाळा;आणखी दोन विश्वस्तांना अटक शक्य, जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशी आदेश न्यायालयाकडून रद्द
![]()
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सुरक्षा रक्षकाकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर उघडकीस आलेल्या व्हीआयपी दर्शन पास घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे या चौकशीसाठी नियुक्त एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याच्या अटकेनंतर आता आणखी दोन विद्यमान विश्वस्त तपास पथकाच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणात कडलगसह अटकेतील आरोपी आणि या दोन विश्वस्तांचे आर्थिक साटेलोटे असल्याचा संशय असून, त्यांच्यावर कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या श्रद्धेचा बाजार मांडून व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली उकळण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेचा विनियोग कसा झाला, याचा पर्दाफाश एसआयटी करत आहे. या काळ्या कमाईतून संबंधित आरोपी आणि विश्वस्तांनी मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता जमा केली आहे. जमिनींचे व्यवहार, आलिशान गाड्या आणि इतर बेनामी संपत्तीचीही सखोल चौकशी सुरू करण्यात येत आहे. या दोन विश्वस्तांमध्ये एक सर्वच व्हीआयपींच्या सत्कार सोहळ्यात नेहमी अग्रेसर असणारा आहे, तर दुसऱ्या विश्वस्ताने प्रत्येक घटनेत विश्वस्त मंडळाचीच पाठराखण करून बाजू मांडलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा मूळ आदेश रांगेत उभ्या भाविकास सुरक्षा रक्षकांकडून मारहाणीची घटना समोर येताच या घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३ मार्च रोजी चौकशी आदेश काढले. या आदेशानुसार, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. जी. व्ही. एस. पवन दत्ता यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर चौकशी अधिकाऱ्याने दुसऱ्याच दिवशी ४ मार्च रोजी स्वतंत्र आदेश काढत देवस्थानचे सचिव आणि पोलिस निरीक्षकांना सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल नोंदी आणि इलेक्ट्रॉनिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले. ट्रस्ट बरखास्त करा; मुख्य न्यायमूर्तींना दिले पत्र मुंबई | देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विद्यमान ट्रस्ट बरखास्त करून त्यावर उच्चस्तरीय नियंत्रण समिती नेमण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि धर्मादाय आयुक्तांना पत्र दिले आहे. शिंदे यांनी विद्यमान विश्वस्त मंडळावर गंभीर आरोप केले आहेत. २०१७ आणि २०२३ मध्ये झालेल्या विश्वस्त निवडीच्या प्रक्रियेत ‘कोट्यवधी रुपयांची’अफरातफर झाल्याचा आरोप त्यांनी केला. व्हीआयपी दर्शन घोटाळ्यात सहभागी विश्वस्तांमुळे व त्यांच्या समर्थकांच्या दादागिरीमुळे मंदिराची प्रतिमा मलिन होत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी केली. याबरोबरच आगामी कुंभमेळ्यासारख्या महासोहळ्याचे नियोजन करण्यासाठी सध्याचे विश्वस्त मंडळ सक्षम नसल्याचे सांगत, शिंदे यांनी एका उच्चस्तरीय नियंत्रण समितीची नियुक्ती करण्याची मागणीही केली आहे. आता कारवाईकडे लक्ष विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनाच दर्शन घोटाळ्यात अटक झाल्याने देवस्थानच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत धर्मदाय सह आयुक्त कार्यालयातील त्र्यंबकेश्वर निरीक्षक गाडगे यांच्या अहवालाकडेही लक्ष लागले आहे. विश्वस्तपदाचा गैरवापर करून भाविकांची लूट केल्याचा ठपका ठेवत कडलग यांचे विश्वस्तपद धर्मदाय सह आयुक्तांकडून रद्द होण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. या प्रकारावर धर्मदाय सह आयुक्त काय कठोर कारवाई करतात? याकडे भाविकांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे काय कारवाई होते हे पहावे लागेल. भाविकाला मारहाण झाल्यानंतर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्याने ३ मार्च २०२६ रोजी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले; मात्र या चौकशी अधिकाऱ्याने अतिउत्साहात थेट श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या जिल्हा न्यायाधीशांचीच चौकशी करण्याची तयारी सुरू केली. जिल्हाधिकारी थेट न्यायव्यवस्थेतील न्यायमूर्तींच्या चौकशीचा घाट घालत असल्याने प्रश्न निर्माण झाला. हा प्रकार लक्षात येताच प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशीचा आदेश रद्द केला.
