पुण्यात सराफ व्यावसायिकाला दीड कोटींचा चुना:20 वर्षांच्या ओळखीचा गैरफायदा घेत 1 किलो सोन्याचा अपहार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
775965e1-1378-49ad-bac9-c3806d4cd319_1778130586049.jpg




पुणे शहरातील एका सराफ व्यावसायिकाकडून दीड कोटी रुपयांचे शुद्ध सोने घेऊन अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सराफ व्यावसायिकाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश उमेश संचेती, मंगला उमेश संचेती आणि उमेश तिलोकचंद संचेती (तिघे रा. आदर्शनगर, पुणे-सातारा रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सराफ व्यावसायिकाची सोन्या मारुती चौक परिसरात पेढी आहे. आरोपींची त्यांची गेल्या वीस वर्षांपासून ओळख आहे. आरोपींची स्वतःचीही सराफी पेढी आहे. व्यवसायात नुकसान झाल्याचे सांगून आरोपींनी सराफ व्यावसायिकाकडून वेळोवेळी दीड किलो शुद्ध सोने घेतले. त्यापैकी 500 ग्रॅम सोने परत केले, मात्र उर्वरित एक किलो शुद्ध सोने परत केले नाही. सराफ व्यावसायिकाने त्यांच्याकडे सोने परत करण्याची मागणी केली असता, आरोपींनी टाळाटाळ केली. अखेर सराफ व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक एस. शिंदे पुढील तपास करत आहेत. मोटारीची काच फोडून रोकड चोरी पुणे-सोलापूर रस्त्यावर मोटारीची काच फोडून चोरट्यांनी रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजेंद्र किसन शिंदे (वय 43, रा. पांढरवाडी, ता. पाटण, जि. सातारा) यांनी मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कामानिमित्त हडपसर परिसरात आले होते. पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात त्यांनी मोटार लावली आणि एका उपाहारगृहात चहा पिण्यासाठी गेले. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मोटारीची काच फोडून 29 हजार 500 रुपयांची रोकड चोरून नेली. उपाहारगृहातून बाहेर पडल्यानंतर रोकड चोरीची घटना उघडकीस आली. पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed