नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरण: आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ:व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले हजर, 12 मे पर्यंत कोठडी

0
fdab6318-9ee9-406f-8f1c-c6e22f25c0de_1778144288022.jpg




पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला पुणे न्यायालयाने १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, आरोपीला बुधवारी न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर सादर करण्यात आले. ही घटना शुक्रवार, १ मे रोजी दुपारी ३ ते रात्री ८ च्या दरम्यान राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पीडित मुलीच्या आईने पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (खून), ६४ (बलात्कार), ७४ (विनयभंग), १३७(२), १४०(१), १४०(३) (अपहरण) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुनावणीदरम्यान, तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी आणि रासायनिक विश्लेषण अहवाल तपासणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. आरोपीने यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का किंवा पीडित मुलीवर आधीही अत्याचार केला होता का, याचा तपास करणे गरजेचे असल्याचेही पोलिसांनी नमूद केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची हत्या करण्यासाठी वापरलेले हत्यार अद्याप हस्तगत करायचे आहे आणि महत्त्वाचे पुरावे गोळा करणे बाकी आहे. ज्या साक्षीदारांनी आरोपीला मुलीसोबत पाहिले, त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. या गुन्ह्यात आरोपीला अन्य कोणाची मदत मिळाली आहे का, याचीही पोलिस कसून चौकशी करत आहेत. न्यायाधीशांनी विचारणा केली असता, आरोपीने मागील सुनावणीवेळी ‘किरकोळ वादातून आपल्याला पकडले’ असल्याचा दावा करत स्वतःचा बचाव केला. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला आणखी पाच दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed