व्याकरणाचे दडपण नको, भाषेतील गंमत ओळखा:अभिजात मराठी पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी- डॉ. नीलिमा गुंडी

0
0144dc9e-089f-45dc-bfc0-4f3ae42443ea_1778130862105.jpg




पुणे: ज्येष्ठ लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांनी म्हटले आहे की, भाषेच्या व्याकरणाचे दडपण न घेता त्यातील गंमती समजून घेऊन भाषा शिकता आली पाहिजे. पुढील पिढीपर्यंत अभिजात मराठी भाषा पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे साहित्य प्रसार आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ‘बालकुमार शब्दोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये खास मुलांसाठी हा महोत्सव 31 मे पर्यंत सुरू राहणार आहे. डॉ. गुंडी यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अक्षरधारा बुक गॅलरी येथील कुसुमाग्रज वाचक कट्ट्यावर हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड आणि अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालक रसिका राठिवडेकर उपस्थित होत्या. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर विश्वास प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित डॉ. नीलिमा गुंडी यांच्या ‘अर्थाचा पत्ता सापडला’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. तसेच, एकनाथ आव्हाड यांच्या ‘गंमत गाणी’ आणि ‘मजेदार कोडी’ या पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. यानंतर मुलांसाठी ‘गट्टी मराठीशी’ हा विशेष कार्यक्रमही सादर करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. नीलिमा गुंडी यांनी सांगितले की, आपण जन्माला आल्यापासून भाषा आपसूक शिकत असतो. लहान मुले ऐकून आणि निरीक्षण करून भाषा आत्मसात करतात. व्यक्तिमत्त्व विकासात विविध शिबिरे जशी महत्त्वाची असतात, तसेच वाचनही व्यक्तिमत्त्व विकासात भर घालते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. भाषा शिकण्यासाठी कानही तल्लख असणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. एकनाथ आव्हाड यांनी यावेळी सांगितले की, मुलांना एकदा पुस्तकाची गोडी लागली की ते आपोआप मोबाईल गेम्ससारख्या इतर आकर्षणांपासून दूर राहतील. मुलांना केंद्रस्थानी ठेवून लेखन केल्यास त्यांना ते नक्कीच भावते, असा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. मुले पुस्तकांपर्यंत येत नसतील, तर आपण पुस्तके मुलांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मुलांचे भावविश्व समजून घेऊन पुस्तकरूपी बाग फुलवून ते अधिक समृद्ध केले पाहिजे. पुस्तकांच्या माध्यमातून होणारे संस्कार चिरकाल टिकणारे असतात, असेही आव्हाड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *