नाशिक रिंगरोडवरून नवा वाद:महिलांवर दडपशाही? संजय राऊतांचा संताप; शेतकरी महिलांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांना सुनावलं

0
730-x-548-new-2026-05-07t121332124_1778136709.jpg




नाशिक शहरातील प्रस्तावित 66 किलोमीटरच्या रिंगरोड प्रकल्पावरून आता मोठा राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. रिंगरोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादन आणि मोजणी प्रक्रियेदरम्यान मातोरी आणि मुंगसरे परिसरातील शेतकरी महिलांवर पोलिसांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, शिवसेना ठाकरे गटानेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. महिलांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेत आपल्यावर झालेल्या कथित अत्याचाराची माहिती दिल्यानंतर संपूर्ण प्रकरणाने नवे राजकीय वळण घेतले आहे. त्यानंतर राऊत यांनी या महिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना रिंगरोडला विरोध करणाऱ्या काही शेतकरी महिला त्यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. यावेळी महिलांनी मोजणीच्या कामादरम्यान पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप केला. काही महिलांना जबरदस्तीने घराबाहेर ओढण्यात आल्याचेही सांगण्यात आले. महिलांची आपबिती ऐकल्यानंतर संजय राऊत संतप्त झाले. त्यांनी तात्काळ प्रांताधिकारी पवन दत्ता यांना फोन लावत अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले. तुमच्या घरी आई-बहिणी नाहीत का? महिलांशी अशी वागणूक देण्याचा अधिकार कोणी दिला? अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. राऊत यांनी फोनवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरताना आपल्या जवळ मारहाणीचे व्हिडिओ असल्याचाही दावा केला. महिलांना फरफटत बाहेर काढणे हा कोणता कायदा आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याचवेळी प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या कामकाजावरही त्यांनी टीका केली. पवन दत्ता हे परप्रांतीय अधिकारी असून त्यांना येथे कोणाच्या शिफारशीवर आणण्यात आले, असा सवाल करत त्यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. प्रशासनाने शेतकऱ्यांशी संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोपही त्यांनी केला. या संपूर्ण वादाची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली. रिंगरोडच्या मोजणीसाठी महसूल विभाग आणि पोलिसांचे पथक मातोरी परिसरात पोहोचले होते. मात्र, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी जमिनी देण्यास विरोध केला. त्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी महिलांवर बळाचा वापर केला. काही महिलांना घरातून बाहेर खेचण्यात आले तर काहींना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण राज्यभर चर्चेत आले. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि बाधित ग्रामस्थ मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. प्रशासनाकडून योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. संजय राऊत देखील स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तसेच पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्याकडेही या प्रकरणाची तक्रार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांवर अत्याचार करून प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न झाला तर शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. संघर्ष आणखी वाढतो का, याकडे लक्ष दरम्यान, रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे. एका बाजूला प्रशासन प्रकल्प शहराच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगत आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकरी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. महिलांवरील कथित मारहाणीमुळे हा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील संघर्ष आणखी वाढतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed