व्यसनमुक्तीतून समृद्ध कामगार जीवनाचा मार्ग:बार्शी नगरपालिकेत जनजागृती कार्यशाळा
![]()
कामगार दिनाचे औचित्य साधून बार्शी नगरपालिका व आयुष व्यसनमुक्ती उपचार केंद्र, जामगाव (ता. बार्शी) यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती विषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कामगार वर्गामध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबविणे व आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे, हा उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मान्यवरांनी व्यसनाधीनतेमुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम यावर प्रकाश टाकला. कामगार वर्गामध्ये ताणतणाव, आर्थिक अडचणी व सामाजिक परिस्थितीमुळे व्यसनाकडे वळण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे सांगितले. या कार्यशाळेत नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, आरोग्य अधिकारी डॉ. अनिता बांगर, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा जगताप, तसेच आयुष व्यसनमुक्ती उपचार केंद्र, जामगावचे प्रमुख डॉ. संदीप तांबारे आणि ज्येष्ठ समुपदेशिका कविता अंधारे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. तनुजा चिकने यांनी केले, उपस्थितांचे आभार प्रतिभा जगताप यांनी मानले. या उपक्रमामुळे कामगारांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून, व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. भविष्यातही अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
