मंत्र्यांच्या ओएसडीवर पत्नीचा गंभीर आरोप, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल:अतुल सावेंनी स्पष्ट केली भूमिका; चौकशीचे आदेश
![]()
पुण्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारे प्रकरण समोर आले आहे. भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी असलेले विजय धुलचंद कारंडे यांच्याविरोधात पत्नीने गंभीर आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्नीला मारहाण करून तिचा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कारंडे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी पुण्यातील क्वीन्स गार्डन परिसरातील निवासस्थानी हा धक्कादायक प्रकार घडला. पत्नीने विजय कारंडे यांच्या मोबाईलमधील काही चॅटबाबत विचारणा केली होती. तसेच मोबाईलचा पासवर्ड मागितल्याने कारंडे संतापल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी पत्नीला बॅटने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता पत्नीचा गळा दाबून तिची हत्या करण्याचाही प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेदरम्यान आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप पत्नीने केला आहे. पीडित महिलेने माध्यमांशी बोलताना अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. मी मंत्र्यांचा ओएसडी आहे, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही, अशी धमकी विजय कारंडे देत असल्याचा दावा तिने केला आहे. गेल्या काही काळापासून मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही तिने सांगितले. पत्नीच्या हातापायांवर मारहाणीमुळे काळे-निळे डाग पडल्याचेही समोर आले आहे. मुंबईला जाताना पत्नी आणि मुलांना सोबत न नेता पुण्यातच ठेवले जात असल्याने पत्नीला संशय आला होता. त्यातूनच मोबाईलच्या पासवर्डबाबत विचारणा करण्यात आली आणि त्यानंतर वाद वाढल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणानंतर मंत्री अतुल सावेंनी तातडीने भूमिका घेत विजय कारंडे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत सावेंनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कारंडे यांच्या पत्नीने केलेली तक्रार अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. या प्रकरणात त्वरित चौकशी होईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या संरक्षणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच महिलांवर अन्याय करणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा इशाराही सावेंनी दिला. दरम्यान, पीडित महिलेच्या वडिलांनीही गंभीर आरोप केले आहेत. कारंडे यांनी त्यांच्याकडे 25 लाख रुपयांची मागणी केली होती, असा दावा त्यांनी केला आहे. सतत धमक्या दिल्या जात असल्याने कुटुंबीय भयभीत झाले होते. अखेर पत्नी आणि मुलाने स्वतःचा जीव वाचवत घराबाहेर पडून थेट पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवत विजय कारंडे यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, मारहाण आणि धमकी देण्याचे गुन्हे दाखल केले आहेत. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. विरोधकांकडूनही सरकारवर टीका या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणातही मोठी चर्चा सुरू झाली आहे. एका मंत्र्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यावर असे गंभीर आरोप झाल्याने विरोधकांकडूनही सरकारवर टीका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून आधीच राज्यात वातावरण तापलेले असताना या घटनेने आणखी खळबळ उडाली आहे. आता पोलिस तपासातून नेमके काय समोर येते आणि सरकार याप्रकरणात पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
