मिशन कन्व्हर्जनची सूत्रधार निदा खान?:नाशिक TCS प्रकरणात SIT च्या तपासातून धक्कादायक माहिती; टार्गेट देऊन धर्मांतराचा कट?

0
image-resize-color-correction-and-ai-2026-04-16t09_1778132206.png




नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित कथित लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्याकडेच कथित मिशन कन्व्हर्जनची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा संशय विशेष तपास पथकाने व्यक्त केला आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, तपास यंत्रणांनी आपला फास अधिक घट्ट केला आहे. सध्या निदा खान फरार असून तिचा शोध घेण्यासाठी राज्यभर विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत. या प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये निदा खान हिचे नाव समोर आले आहे. तपासादरम्यान टीसीएसमधील एका पुरुष कर्मचाऱ्यासह महिला कर्मचाऱ्याचे धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच धार्मिक भावना दुखावणे, गुंगी आणणारे पदार्थ वापरून अत्याचार करणे आणि पीडितांना धमकावणे असे गंभीर आरोपही या प्रकरणात करण्यात आले आहेत. एसआयटीच्या हाती लागलेल्या काही पुराव्यांनुसार निदा खान ही केवळ सहभागी नव्हती, तर काही विशिष्ट व्यक्तींना लक्ष्य करण्याचे काम तिच्याकडे देण्यात आले होते, असा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी निदा खानने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप आणि प्राथमिक पुरावे लक्षात घेऊन तिचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर ती फरार झाली असून पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. नाशिक पोलिसांकडून विविध जिल्ह्यांमध्ये तपास सुरू असून तिच्या संपर्कातील लोकांचीही चौकशी केली जात आहे. तपास यंत्रणांच्या मते, निदा खानला अटक झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सुरुवात 2 एप्रिल रोजी झाली होती. टीसीएसमधील एका पुरुष कर्मचाऱ्याने मुंबई नाका पालिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करत तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन या चौघांना अटक केली. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या चौकशीतून काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि संभाषणांचे तपशील समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तपास अधिक खोलात जात असताना या प्रकरणाचे धागेदोरे राज्याबाहेर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील जाळ्याशी जोडलेले असण्याची शक्यता तपासली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातही विशेष तपास पथकाने गती वाढवली आहे. महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीच्या आरोपांमध्ये अटक झालेल्या अशोक खरातविरोधात नऊ गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू आहे. एसआयटीकडून गोळा करण्यात आलेले पुरावे, पीडितांचे जबाब आणि तपासातील निष्कर्ष यांच्या आधारे पुढील आठवड्यात न्यायालयात चार्जशीट सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता अशोक खरात प्रकरणात महिलांवरील अत्याचाराची आठ आणि फसवणुकीची एक अशी एकूण नऊ प्रकरणे तपासात आहेत. अटकेनंतर दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी एसआयटी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, निदा खान प्रकरणातही पोलिसांकडून तांत्रिक पुरावे, आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या संपर्कांची साखळी तपासली जात आहे. या दोन्ही प्रकरणांमुळे राज्यातील तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed