Weather Update | पुढील 4 दिवस तापमान वाढणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

0
sayali-web-2026-05-07T105743.376-1.webp.webp


Weather Update | महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. कधी प्रचंड उकाडा, तर कधी अचानक पावसाच्या सरी असा वातावरणाचा लहरीपणा कायम असल्याने लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हामुळे कूलर आणि एसीचा आधार घ्यावा लागतो, तर अचानक पडणाऱ्या पावसामुळे छत्रीची धावपळ सुरू होते. या सततच्या बदलांमुळे नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे.

राज्यात उष्णतेचा प्रभाव

दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यात उष्णतेचा प्रभाव पुन्हा वाढताना दिसत आहे. घामाच्या धारांसह उकाडाही वाढला असून आता हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील चार दिवसांत राज्यातील कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थितीनंतर बुधवारी बहुतांश भागातील तापमानात काही प्रमाणात घट झाली असली तरी आगामी दिवसांत पुन्हा तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारपासून राज्यातील पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उकाड्याची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. तर गुरुवार आणि शुक्रवारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, बुधवारी कोकणातील सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे 34.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत 33.9 अंश, तर कुलाबा केंद्रात 33.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारी मुंबईतील कमाल तापमान 35 अंश, तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

पुण्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. एप्रिल अखेरीस पुण्यात तापमान 40 अंशांच्या आसपास गेले होते. मात्र गेल्या काही दिवसांत तापमानात काहीशी घट झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. रात्रीच्या वेळेस गारवा जाणवत असल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडा आराम मिळत आहे.

News Title: Weather Update Maharashtra Heat Wave Rain Alert

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed