सुनेत्रा पवारांच्या जागेसाठी राष्ट्रवादीत जोरदार लॉबिंग:राज्यसभेसाठी पाच बडे नेते रिंगणात; महिला आयोगाच्या पदावरही चर्चा

0
730-x-548-new-2026-05-07t093804206_1778127617.jpg




राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी या जागेसाठी रस दाखवल्याने राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत स्पर्धा वाढल्याचे चित्र दिसत आहे. राज्यसभेच्या जागेसोबतच पक्षातील इतर महत्त्वाच्या रिक्त पदांवरही लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या राज्यसभेच्या जागेसाठी सध्या अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत. आनंद परांजपे, भुजबळ कुटुंबीय, मलिक कुटुंबीय, अविनाश आदिक आणि विक्रम काकडे ही प्रमुख नावे इच्छुकांच्या यादीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पक्षात कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे इच्छुक नेत्यांची सतत भेटीगाठी सुरू असल्याचीही चर्चा आहे. मात्र, अंतिम निर्णयाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. राज्यसभेच्या जागेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक महत्त्वाची संघटनात्मक पदे सध्या रिक्त आहेत. युवक प्रदेशाध्यक्षपद गेल्या दहा महिन्यांपासून रिकामे आहे. सूरज चव्हाण यांना पदावरून दूर केल्यानंतर अद्याप नव्या अध्यक्षाची नियुक्ती झालेली नाही. त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर महिला आयोग आणि महिला प्रदेशाध्यक्षपदही रिक्त आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत अनेक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई प्रदेशाध्यक्षपदाबाबतही राष्ट्रवादीत अनिश्चितता कायम आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटूनही या पदावर कोणाची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात पक्षातील अनेक रिक्त जागा एकाचवेळी भरल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व नियुक्त्यांमुळे पक्षातील गटबाजी आणि समीकरणांवरही परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी विजय मिळवला होता. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी दोन लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवत मोठा राजकीय संदेश दिला. त्यानंतर त्यांनी दिल्लीत उपराष्ट्रपतींची भेट घेऊन राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला होता. त्यामुळे आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेतृत्व कोणत्या नेत्यावर विश्वास दाखवणार सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन खासदार उरले आहेत. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि नितीनकाका पाटील यांचा समावेश आहे. प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत असून नितीनकाका पाटील यांची मुदत 2028 पर्यंत आहे. तर नुकतेच राज्यसभेवर निवडून गेलेले पार्थ पवार 2032 पर्यंत खासदार राहणार आहेत. आता सुनेत्रा पवार यांच्या जागी पक्ष नेतृत्व कोणत्या नेत्यावर विश्वास दाखवणार आणि संघटनात्मक पातळीवर कोणते बदल करणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed