राजकारणात येऊन चुकलो का? महिलांवरील अत्याचारांवर रोहित पवारांची खंत:फास्टट्रॅक कोर्ट तरी न्याय कुठे? व्यक्त केली नाराजी

0
image-resize-color-correction-and-ai-2026-05-07t09_1778126781.png




जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे एका पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील महिला सुरक्षेवर गंभीर चिंता व्यक्त केली. लहान मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत बोलताना त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. राजकारणात असूनही जर चिमुकल्या मुलींना आणि महिलांना न्याय देता येत नसेल, तर आपण कुठेतरी फसलो किंवा चुकलो आहोत, अशा शब्दांत त्यांनी आपली खंत मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवार जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे 2023 मध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणातील पीडित कुटुंबाची भेट घेतली. सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यावेळी या प्रकरणासाठी फास्टट्रॅक कोर्टाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, तीन वर्ष उलटूनही अद्याप न्याय मिळालेला नसल्याची खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली. फास्टट्रॅक कोर्टच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सांगितले की, जर फास्टट्रॅक कोर्ट खरंच प्रभावी असतील, तर गोंडगाव प्रकरणातील पीडित कुटुंबाला अजून न्याय का मिळाला नाही? त्यांनी पुण्यातील नसरापूर प्रकरणाचाही उल्लेख करत अशा घटनांमध्ये केवळ घोषणा करून चालणार नाही, तर प्रत्यक्षात जलद न्याय मिळायला हवा, असे स्पष्ट केले. या कुटुंबामध्ये आजही भीतीचे वातावरण असून, कायदा खरंच गरीबांच्या बाजूने उभा राहतो का? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी 2019 मध्ये मांडण्यात आलेला शक्ती कायदा तातडीने लागू करण्याची मागणीही त्यांनी केली. या कायद्यात आणखी कठोर तरतुदी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. अत्याचार करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती निर्माण झाली पाहिजे. महिलांवर आणि चिमुकल्या मुलींवर होणाऱ्या घटना कमी व्हायच्या असतील, तर शासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत, असे ते म्हणाले. या प्रकरणात कोणतेही राजकारण न आणता पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या आकडेवारीवरही रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते, महाराष्ट्रात वर्षभरात महिलांशी संबंधित 50 हजारांहून अधिक गुन्हे दाखल होतात. दिवसाला 137 गुन्हे आणि 24 बलात्काराच्या घटना घडत असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांवरील ताण आणि प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांना इतर कामांमध्ये गुंतवले जात असल्याने अशा गंभीर प्रकरणांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, असेही त्यांनी म्हटले. संपूर्ण यंत्रणा महिलांच्या सुरक्षेबाबत कमी पडतेय यावेळी त्यांनी एका मंत्र्यांच्या ओएसडीने पत्नीला मारहाण केल्याच्या घटनेचाही उल्लेख केला. जर सत्तेत असलेल्या लोकांच्या जवळील व्यक्तींनाही महिलांशी असे वागणे योग्य वाटत असेल, तर ही गंभीर बाब आहे, असे ते म्हणाले. गृह विभाग आणि संपूर्ण यंत्रणा महिलांच्या सुरक्षेबाबत कमी पडत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला गोंडगाव प्रकरणात तातडीने न्याय देण्याची मागणी केली. तसेच गावातील आठ तरुणांवर चुकीची कारवाई झाली असल्याचा दावा करत ती मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed