जिल्ह्याच्या मातीत ‘केसर’आंब्याचा दरवळ:कुऱ्हा येथील युवा शेतकरी हितेंद्र रणालेकर यांचा प्रयोग ठरला यशस्वी
![]()
पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्यास विदर्भाची माती सोनही उगवू शकते, हे कुऱ्हा येथील युवा शेतकरी हितेंद्र रणालेकर यांनी आपल्या प्रयोगशीलतेतून सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या दोन एकर क्षेत्रात ‘केसर’ आंब्याची यशस्वी लागवड करून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. विदर्भाच्या उष्ण आणि कोरड्या हवामानात आंब्याची लागवड आव्हानात्मक मानली जाते. तरीही या आव्हानाला संधी मानत रणालेकर यांनी सुमारे २०० ‘केसर’ आंब्यांची झाडे लावत नियोजनबद्ध फळबाग उभारली. सुरुवातीला हवामानातील बदल, मर्यादित पाणीसाठा आणि योग्य व्यवस्थापनाची कसोटी होती; परंतु जिद्द, अभ्यास आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर त्यांनी या सर्व अडचणींवर मात केली. बागेच्या यशामागे ठिबक सिंचनाची अचूक आखणी, संतुलित खत व्यवस्थापन, वेळोवेळी छाटणी आणि प्रभावी कीड-रोग नियंत्रण या आधुनिक उपाययोजनांचा मोठा वाटा आहे. परिणामी आज प्रत्येक झाड भरघोस फळांनी लगडले असून बागेचा सुवास संपूर्ण परिसरात दरवळत आहे. रणालेकर यांच्या या उर्वरित. पान ४ ^”पारंपरिक शेतीपद्धतींपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला अडचणी आल्या, पण आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे यश मिळालं. योग्य नियोजन असेल तर शेती निश्चितच फायदेशीर ठरते.” -हितेंद्र रणालेकर, युवा शेतकरी, कुऱ्हा. कडक उन्हातही केसर आंब्यांची उत्कृष्ट गुणवत्ता यंदाच्या हंगामात बागेतून फळधारणा झाली असून सुमारे ३ लाखापर्यंत उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पारंपरिक पिकांच्या तुलनेत फळबाग शेती किती लाभदायक ठरू शकते, याचे हे उदाहरण ठरत आहे. विदर्भाच्या कडक उन्हातही या ‘केसर’ आंब्यांनी उत्कृष्ट गुणवत्ता साधली आहे. मोहक केशरी रंग, सुबक आकार आणि गोडसर मधूर चव यामुळे बाजारपेठेत या आंब्याला मोठी मागणी असून व्यापाऱ्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
