छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांवरून संताप:अंबादास दानवेंनी सरकारला धारेवर धरलं; नितीन गडकरींना थेट पत्र
![]()
छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेषतः वैजापूरजवळील चार ते पाच किलोमीटरचा पट्टा अत्यंत धोकादायक बनला असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या परिसरात गेल्या काही महिन्यांत अनेक गंभीर अपघात घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबादास दानवे यांनी पत्रात म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील काही भागात मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खराब स्थितीमुळे वाहनांचे संतुलन बिघडत आहे आणि त्यातून अपघात घडत आहेत. विशेषतः पावसाळ्याच्या काळात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे जीवितहानीचे प्रमाण वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने वेळोवेळी दुरुस्तीची कामे केल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही सुधार दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या महामार्गावर आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून रस्त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दानवे यांनी नमूद केले की, या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असल्याने दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. पत्रात महामार्गालगत आवश्यक सुविधांचा अभाव असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. वाहनचालकांसाठी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढते आणि अपघातांचा धोका अधिक गंभीर बनतो. तसेच या मार्गावर योग्य प्रकाशयोजना आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्डे दिसत नसल्याने गंभीर दुर्घटना घडत असल्याचे दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे. याशिवाय भविष्यात या महामार्गालगत औद्योगिक आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले जाणार असल्याने वाहतुकीचा ताण आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे मजबुतीकरण, खड्डेमुक्ती, सुरक्षित पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाय तातडीने राबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. केवळ तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न दरम्यान, अंबादास दानवे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. महामार्गावरील धोकादायक परिस्थितीमुळे नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. रस्त्याची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे सुरू करावीत, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस धोरण आखावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या पत्रामुळे आता केंद्र आणि राज्य प्रशासन या प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्यानंतर खैरेंकडून दानवेंचे स्वागत शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य पदी निवड झाल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली. विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्यानंतर खैरे यांनी दानवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
