अजित पवारांचा विमान अपघात की घातपात?:अमोल मिटकरींनी 'अघोरी पूजे'वर बोट; पोलिस महासंचालक आणि SIT प्रमुखांची घेतली भेट

0
db-temp-cover-marathi-2026-05-06t135604685_1778056073.jpg




उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता या अपघाताला ‘अघोरी’ विद्येची आणि ‘भोंदूगिरी’ची किनार असल्याचा खळबळजनक संशय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी मिटकरी यांनी मुंबईत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि ‘एसआयटी’ (SIT) प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची भेट घेऊन निवेदने सादर केली. अमोल मिटकरी यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन या प्रकरणातील गूढ उकलण्याची मागणी केली. मिटकरी यांच्या दाव्यानुसार, अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी काही ठिकाणी संशयास्पद आणि अघोरी पूजा पार पडल्याची माहिती समोर येत आहे. या पूजेचा थेट संबंध अटकेत असलेला भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी आणि त्याच्या भक्तांशी असल्याचा संशय मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. हा अपघात नैसर्गिक होता की एखाद्या अघोरी कृत्याचा किंवा षडयंत्राचा भाग होता, याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. SIT प्रमुखांकडे सोपवले पुरावे भोंदू खरात प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली ‘एसआयटी’ची स्थापना केली आहे. अमोल मिटकरी यांनी आज सातपुते यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित काही पुरावे व संशयास्पद अघोरी पुजा व जनतेच्या मनात असलेली शंका याबाबत तपास करण्यासाठी निवेदन दिले. तसेच सकारात्मक प्रतिसाद भेटेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. नेमके काय म्हणाले अमोल मिटकरी? अमोल मिटकरी यांनी पोलिस महासंचालक सदानंद दाते आणि खराती प्रकरणातील एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “काठेवाडी खताळ पट्टा परिसरात बोकड उलटे टांगून त्याखाली अखोरी पूजा झाली. विद्या प्रतिष्ठाणच्या परिसरात, सहयोग बंगला परिसरात, तसेच देवगिरी बंगल्याभोवती असे जे काही प्रकार मला आढळले, त्याचे सगळे फुटेज ज्यांना दिलेले आहेत. मला ज्या ज्या काही गोष्टी आढळल्या, त्यांच्या व्हिडिओचा एक पेनड्राईव्ह देखील लवकर देणार आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास करायला आणखी गती यावी, महाराष्ट्रासमोर सत्य यावे, हा अपघात असेल तर अपघातच आणि तो घातपात असेल आणि त्यामागे खरात प्रकरण असेल, त्या अनुषंगाने त्यांची चौकशी व्हावी, एवढीच विनंती आहे.” खरातच्या भक्तांनी बारामतीत अघोरी पूजा केली का? अमोल मिटकरी म्हणाले, “एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी आम्ही सांगितले की, तपास यंत्रणा तुमच्या अध्यक्षतेखाली आहे. अशोक खरात हा तुम्हीच अटक केलेला आहे. त्याची चौकशी करताना त्याचे कोणते भक्त बारामतीत होते का? त्यांनी हे सगळे घडवून आणले का? कारण बारामतीत जाऊन अघोरी पूजा करायची बाहेरच्या लोकांची हिंमत नाहीये. त्यामुळे बारामतीतील काही लोक अशोक खरातला सहकार्य करत होती का? या अनुषंगाने तपास झाला पाहिजे. एका महिन्यात सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर मी माझे पुढेच पाऊल त्यावेळेस सांगणार,” असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed