धक्कादायक!:सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी पत्नीनेच दिली पतीची सुपारी, चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
![]()
पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळवण्याच्या लोभापोटी एका पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. या क्रूर हत्याकांडाचा छडा लावण्यात भद्रावती पोलिसांना यश आले असून, मुख्य सूत्रधार पत्नीसह चार आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी असलेले रवींद्र कुलमेथे (46) हे पेशाने शिक्षक होते. 2 मे रोजी भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोडपेठ परिसरातील हनुमान मंदिराजवळ त्यांचा मृतदेह अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळला होता. मृताच्या गळ्याला प्लास्टिकची पिशवी आणि दुपट्टा गुंडाळलेला असल्याने ही हत्या असल्याचे प्राथमिक दर्शनी स्पष्ट झाले होते. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे मृताची ओळख पटवली. असा रचला हत्येचा कट तपासादरम्यान पोलिसांना मृताची पत्नी दीपमाला कुलमेथे हिच्यावर संशय आला. तिची सखोल चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली देत धक्कादायक वास्तव समोर आणले. दीपमालाने पोलिसांना सांगितले की, पतीकडून होणाऱ्या त्रासाला ती कंटाळली होती. नागपूर येथे उपचारासाठी गेली असता तिची ओळख वर्षा परचाके नावाच्या महिलेशी झाली. वर्षाने तिला पतीचा काटा काढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दीपमालाने वर्षा, प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी यांच्या मदतीने 1 लाख रुपयांची सुपारी देऊन पतीच्या हत्येचा कट रचला. लग्नाचे निमित्त अन् घात 29 एप्रिल रोजी दीपमालाने पती रवींद्र यांना दिघोरी येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी बोलावून घेतले. दुसऱ्या दिवशी आरोपी सोनू कालोकर आणि नाझीर अंसारी कार घेऊन तिथे पोहोचले. दीपमालाने पतीला आरोपींच्या स्वाधीन केले. आरोपींनी रवींद्र यांना घोडपेठ येथील निर्जन स्थळी नेले आणि कारमध्येच गळा आवळून त्यांची निर्घृण हत्या केली. नोकरीसाठी पतीचा बळी हे पती-पत्नी गेल्या अनेक वर्षांपासून विभक्त राहत होते. मात्र, पती शिक्षक असल्याने त्यांच्या निधनानंतर आपल्याला ‘अनुकंपा’ तत्त्वावर सरकारी नोकरी मिळेल, या स्वार्थापोटी पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. केवळ सरकारी नोकरी आणि पैशांच्या हव्यासापोटी एका महिलेने आपल्याच पतीचे कुंकू पुसल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
