जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसराचा होणार कायापालट:पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे सर्वांगीण विकासाचे निर्देश, मुंबईत आढावा बैठक
![]()
जागतिक स्तरावर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या अजिंठा परिसराचा नियोजनबद्ध व सर्वांगीण विकास करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मुंबई येथील शासकीय निवासस्थान मेघदूत येथे अजिंठा परिसरातील पर्यटन विकासासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सदर बैठकीस सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दूल सत्तार उपस्थित होते. तसेच पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव विजय पोवार, पर्यटन संचालनालयाचे कार्यकारी अभियंता आकाश चकोर, छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत तसेच संबंधित विभागांचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान अजिंठा लेणी परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुमारे ७०० एकर क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. सदर क्षेत्रात पर्यटकांसाठी आधुनिक व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत तसेच प्रकल्पांच्या टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. यासाठी स्थळ पाहणी करून लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन व पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली सल्लागार समिती स्थापन करण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच अजिंठा व घटोत्कच लेणी परिसरातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसह स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने व्यापार संकुल विकसित करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुरक्षा व्यवस्था व इतर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही मंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दरम्यान शिव स्मारक व भीम पार्क या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार अब्दूल सत्तार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित केलेल्या विषयाबाबत शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे असे देसाई यांनी स्पष्ट केले.
