नवरी एक, नवरदेव अनेक:आठ लग्नांनंतर नवव्या वेळी पर्दाफाश; लाखो लुटणाऱ्या बनावट नवरीला बेड्या, बोगस टोळीचा भंडाफोड

0
730-x-548-new-2026-05-05t160957402_1777977683.jpg




बीड जिल्ह्यात लग्नाच्या नावाखाली मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून बोगस विवाह लावणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका तरुणीने आधीच अनेक वेळा लग्न करून नवऱ्या मुलांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, आठ लग्नं करूनही ही फसवणूक सुरूच ठेवत नवव्या लग्नावेळी तिचे बिंग फुटले आणि अखेर पोलिसांनी नवरीसह एजंटाला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातही अशाच प्रकारचा विवाह फसवणुकीचा प्रकार समोर आला होता. गुजरातमधील कुसुमबेन घाटाड या महिलेने खोटी माहिती देऊन आणि आधीचे लग्न लपवून दुसऱ्यांदा विवाह केला होता. या प्रकरणात तिच्यासह तिची आई नजमा मोमीन, बहीण सादिया शेख, अल्पवयीन भाऊ आणि एजंट सुरेखा सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर आता बीडमधील प्रकार समोर आल्याने अशा टोळ्या सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यातील उमापूर गावात हा प्रकार उघड झाला. येथे एका युवकाला विवाहासाठी मुलगी दाखवून त्याच्याकडून मोठी रक्कम घेतली गेली. एजंटच्या माध्यमातून या तरुणाचे लग्न लावून देण्यात आले. मात्र, काही दिवसांतच संशय निर्माण झाल्यानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित तरुणीने यापूर्वीही आठ जणांशी लग्न करून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या टोळीची कार्यपद्धतीही तितकीच धक्कादायक आहे. ग्रामीण भागातील विवाहासाठी इच्छुक तरुणांना लक्ष्य करून त्यांना मुलगी दाखवली जात असे. त्यानंतर लग्न जमवून देण्याच्या नावाखाली मोठी रक्कम घेतली जात असे. लग्नानंतर काही काळातच नवरी गायब होत असे किंवा इतर कारणांनी नातं तोडत असे. अशा प्रकारे अनेक तरुणांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात उमापूर येथील पीडित युवक योगेश शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यांनी थेट पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली. त्यानंतर चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तरुणी आणि एजंटाला अटक केली असून या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेतला जात आहे. कठोर कारवाई करण्याची मागणी दरम्यान, या घटनेमुळे ग्रामीण भागात विवाह जुळवताना सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. अशा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed