अखेर SRPF गट 5 अंतर्गत घेण्यात आलेली परीक्षा स्थगित:अपर पोलिस महासंचालकांकडून कारवाई; 100 पैकी 85 प्रश्न जसेच्या तसे आले होते छापून
![]()
महाराष्ट्र पोलिस भरती अंतर्गत राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) गट 5, दौंड येथील लेखी परीक्षेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका खाजगी प्रकाशनाच्या सराव पुस्तकातील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न या परीक्षेत जसेच्या तसे विचारण्यात आले होते. विरोधी पक्षांनी यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर, पोलिस भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षकांनी तातडीने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अपर पोलिस महासंचालकांनी या संदर्भात एक अधिकृत पत्रक काढून दौंड येथील ही भरती प्रक्रिया तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली आहे. खाजगी प्रकाशकाच्या पुस्तकातील प्रश्न जसेच्या तसे आल्यामुळे यामागे काही मोठे रॅकेट किंवा संगनमत आहे का, याचा तपास आता पोलिस प्रशासनाकडून केला जात आहे. राज्य राखीव पोलिस बल (SRPF) गट क्रमांक 5, दौंड यांच्या अधिपत्याखाली सन 2024-25 मधील सशस्त्र पोलिस शिपाई भरतीसाठी 2 मे 2026 रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न हे ‘महाराष्ट्र पब्लीकेशन पोलिस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच 10’ मधील जसेच्या तसे असल्याचे तक्रारी आणि माध्यमांद्वारे समोर आले आहे. या प्रकारामुळे पोलिस भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून उमेदवारांमध्येही असंतोष पसरला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल, पुणे यांच्यामार्फत 4 मे 2026 पासून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत दौंड येथील ही संपूर्ण भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या चौकशीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सत्य समोर येईल आणि त्यानुसार पुढील योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
