महिला आयोगावर मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीची बातमी फेक:सोशल मीडियावर चर्चा, पण सत्य वेगळंच; रोहित पवारांच्या वक्तव्याने गैरसमज?

0
730-x-548-new-2026-05-05t155523117_1777978571.jpg




गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र, आता ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने यासंदर्भात अधिकृत भूमिका मांडत अशी कोणतीही नियुक्ती झालेली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पसरलेल्या या बातमीचा फोलपणा उघड झाला आहे. या अफवेची पार्श्वभूमी समजून घेतली तर पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या एका गंभीर घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येनंतर अनेक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत सरकारवर टीका केली होती. रोहित पवार यांनी महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित करत, या पदावर राजकीय व्यक्ती नेमू नये अशी ठाम भूमिका मांडली होती. त्यांनी स्पष्टपणे सुचवले होते की, मीरा बोरवणकर किंवा मेधा गाडगीळ यांच्यासारख्या अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. त्यांच्या या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत काही सोशल मीडिया पोस्टमध्ये थेट बोरवणकर यांची नियुक्ती झाल्याचे सांगण्यात आले आणि हीच माहिती वेगाने व्हायरल झाली. दरम्यान, या वृत्ताचे खंडन वृत्तसंस्था एएनआयनेही केले आहे. प्रशासनानेही नागरिकांना अशा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सध्या महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्तच असून, सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील काळात या पदावर कोणाची नियुक्ती होणार, याबाबत उत्सुकता कायम आहे. मीरा बोरवणकर या महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठित माजी आयपीएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. 1981 च्या बॅचमधील त्या राज्य केडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी ठरल्या होत्या. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेली प्रकरणे हाताळली आहेत. जळगावमधील बहुचर्चित प्रकरण उघडकीस आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. तसेच मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख म्हणून त्यांनी दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या टोळ्यांवर कारवाई केली होती. निवृत्तीनंतर त्यांनी ‘मॅडम कमिशनर’ हे पुस्तक लिहिले याशिवाय अबू सालेम आणि इक्बाल मिर्ची यांच्या प्रत्यार्पण प्रक्रियेतही त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. येरवडा कारागृहाच्या महानिरीक्षकपदी असताना त्यांनी याकूब मेमनच्या फाशीची प्रक्रिया पाहिली होती. निवृत्तीनंतर त्यांनी ‘मॅडम कमिशनर’ हे पुस्तक लिहिले असून त्यामधील काही उल्लेखांमुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, रोहित पवार यांनी वर्षा देशपांडे आणि मनीषा गुप्ते यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची नावेही सुचवली असून, महिला आयोगासाठी सक्षम आणि तज्ज्ञ नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed