पुण्यात एकमेकांकडे बघण्यावरून वाद; तरुणाचा खून:चार अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात, निरीक्षण गृहात रवानगी

0
8b513be8-908a-4690-bf3e-0b8d1f94683f_1777993972968.jpg




पुण्यातील धनकवडी परिसरातील आंबेगाव पठार भागात एकमेकांकडे बघण्याच्या वादातून एका १८ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून आणि तीक्ष्ण शस्त्राने वार करून हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. नयन सचिन जाधव (वय १८, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नयनच्या आईने या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी दिलेल्या माहितीनुसार, खून केल्याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसार त्यांची रवानगी निरीक्षण गृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी आणि नयन हे धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहणारे आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला होता. सोमवारी (४ मे) रात्री सव्वानऊच्या सुमारास नयन आंबेगाव पठार येथील निलगिरी चौकात थांबला होता. त्यावेळी अल्पवयीन आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला आणि तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या नयनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पसार झालेल्या अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक एस कोडग या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. खासगी कंपनीतून तांब्याची तार चोरीला हडपसरमधील एका खासगी कंपनीच्या आवारातून दोन लाखांची तांब्याची तार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत बापू ज्ञानदेव माने (वय ४४, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने हे खासगी कंपनीत सुरक्षारक्षक आहेत. हडपसरमधील माळवाडी परिसरात खासगी कंपनी आहे. २ मे रोजी कंपनीच्या आवारात चोरटे शिरले. चोरट्यांनी दोन लाख २० हजारांची तांब्याची तार चोरून नेली. पोलीस कर्मचारी एन खटके तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed