पुणे मनपाकडून गणेशखिंड रस्त्यावरील हेरिटेज वृक्षतोडीचा घाट:नियमांना बगल देत शेकडो झाडे कापण्याचा आरोप: वंदना चव्हाण

0
9f093f87-5d2f-4c72-8991-4155a99590c5_1777994194850.jpg




पुणे महानगरपालिकेने गणेशखिंड रस्त्यावरील ५० वर्षांहून अधिक जुन्या ‘हेरिटेज’ वृक्षांची कत्तल करण्याचा घाट घातला आहे. या प्रकरणी माजी खासदार वंदना चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत. महापालिकेने वृक्षतोडीसाठी नियमांना बगल दिली असून, संबंधित अधिकाऱ्यांना नियमावलींची माहिती नसल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. वृक्ष संरक्षण कायद्यानुसार, हेरिटेज झाडे कापण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत; यासाठी राज्य वृक्ष प्राधिकरणाची परवानगी अनिवार्य आहे. मात्र, प्रशासनाने अशी कोणतीही परवानगी न घेता गणेशखिंड रस्त्यावरील शेकडो वृक्षांच्या मुळावर घाव घालण्याचे कारस्थान रचले आहे, असे चव्हाण यांनी म्हटले. महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम १९७५ मधील सुधारित तरतुदीनुसार, ५० वर्षांपेक्षा जुन्या झाडांना ‘वारसा वृक्ष’ म्हणून विशेष संरक्षण दिले जाते. अशा वृक्षांची तोड करण्यासाठी राज्य वृक्ष प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. गणेशखिंड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अशा वृक्षांचे अस्तित्व असून, या संदर्भातील प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवण्यात आलेला नसल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास आणले. गणेशखिंड रस्त्यावरील ५२९ हेरिटेज वृक्षांच्या तोडीची गरज नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्याचे रुंदीकरण नेमके का केले जात आहे, तसेच याचा कोणताही फायदा नसताना वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप माजी खासदार चव्हाण यांनी केला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कायद्याचे अज्ञान आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मेट्रोचे खांब सुमारे ३६ मीटर अंतरावर असताना रस्ता ४५ मीटरपर्यंत रुंद करण्याचा निर्णय का घेतला, याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात येत आहे. नियमानुसार आवश्यक असलेल्या जागेऐवजी अधिक रुंदी ठेवून झाडे तोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, अधिनियमातील कलम ८(२) नुसार पर्यायी आराखडा सादर करणे आवश्यक असताना तो उपलब्ध नसल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वृक्षतोडीच्या विरोधात आतापर्यंत सुमारे ७ हजार हरकती नोंदवण्यात आल्या असून, नागरिकांनी ‘मानवी साखळी’ आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे. प्रशासक राजवटीत नागरिकांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत, ही वृक्षतोड तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed