शिंदेफळ येथे आगीत दोन घरे भस्मसात:लाखोंचे नुकसान, हळद विक्रीतून आलेले पैसेही जळाले; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय
![]()
सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथे दोन घरांना आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य, शेतीमाल तसेच हळदी विक्री करून आलेले रोख रक्कम जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी ता. ५ दुपारी घडली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शॉर्ट सर्किटमुळे हि आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथील विनोद लोणकर हे कुटुंबियांसह शेतात कामाला गेले होते. दुपारच्या सुमारास त्यांच्या घरातून धुर निघू लागला. याचवेळी सोसाट्याचा वारा असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. विनोद यांच्या घराला आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र काही वेळातच आगीची झळ शेजारी असलेल्या विनोद तुरुकमाने यांच्या घराला बसली. दोन्ही घरे आगीच्या भक्षस्थानी सापडले. दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण दरम्यान, नागरिकांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी ओतण्यास सुरवात केली. त्यानंतर सेनगाव नगरपंचायतीचे अग्नीशमन दल दाखल झाले. तसेच सेनगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार सुभाष चव्हाण, नवखे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमनदल व पोलिस, गावकऱ्यांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळविले. सुमारे दोन तासानंतर आग आटोक्यात आली. मात्र तो पर्यंत दोन्ही घरातील संसारोपयोगी साहित्यासह रोख रक्कम, शेतीमाल जळून खाक झाला होता. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय यामध्ये विनोद लोणकर यांच्या घरातील हळद विक्री करून आणलेले १ लाख रुपये व इतर साहित्य जळाले तर विनोद तुरुकमाने यांच्या घरात हळद विक्री करून आणलेले दीड लाख रुपये, तसेच घरात ठेवण्यात आलेले ६० हजार रुपये, १ लाख रुपये किंमतीची सोन्याची पोत व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीमध्ये दोन्ही कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
