डॉ. संग्राम पाटील यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा:ब्रिटनला परतण्याचा मार्ग मोकळा; भाजप नेत्याबद्दलच्या पोस्टमुळे दाखल झाला होता गुन्हा
![]()
भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि प्रसिद्ध युट्युबर डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधात बजावण्यात आलेल्या लुकआउट सर्क्युलरमध्ये आवश्यक बदल करण्याचे आदेश न्यायालयाने 5 मे 2026 रोजी दिले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे डॉ. संग्राम पाटील यांचा ब्रिटनला परतण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना कायदेशीर प्रक्रियेतून मोठा दिलासा मिळाला आहे. डॉ. संग्राम पाटील यांच्यावर एका भाजप पदाधिकाऱ्याने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या नेत्याबद्दल द्वेष पसरवल्याचा आणि मानहानी केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्यावर मानहानीसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्या प्रवासावर निर्बंध आणले होते. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे त्यांच्या परदेश प्रवासातील तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. लुकआउट सर्क्युलरमध्ये तातडीने बदल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या आदेशानुसार, संग्राम पाटील यांच्या लुकआउट सर्क्युलरमध्ये तातडीने बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून ते येत्या सोमवारपर्यंत ब्रिटनला परतू शकतील. तपासादरम्यान जेव्हा गरज पडेल तेव्हा तपास यंत्रणांसमक्ष हजर राहून पूर्ण सहकार्य करण्याचे लेखी हमीपत्र डॉ. संग्राम पाटील यांनी दिले असून, त्यांनी सादर केलेले हे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मान्य केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांच्या परदेश प्रवासातील कायदेशीर अडथळे दूर झाले असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ब्रिटनला जाता न आल्याने माझे बरेचसे नुकसान झाले- संग्राम पाटील यानंतर डॉ. संग्राम पाटील यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले की, अर्थातच, या सगळ्यामुळे 4 महीने मला ब्रिटनला जाता न आल्याने माझे बरेचसे नुकसान झालेले आहे. पण आता मला माझे हॉस्पिटल सुरू करता येईल. मुंबई पोलिसांना मी प्रतिज्ञापत्र दिले की, आवश्यकता असेल तेव्हा मी इकडे येईन. आणि हेच मी पहिल्यापासून त्यांना सांगतोय. अखेर कोर्टाने प्रवासासंदर्भातील बंधन काढलेली आहेत. मी निर्दोष मुक्त होईन पुढे बोलताना डॉ. संग्राम पाटील म्हणाले, मला कल्पना होती की, मला अशा स्वरूपाच्या घटनेमधून कधीतरी जावे लागणार आहे. पण अशा एखाद्या फेसबुकवरच्या साध्या पोस्टमुळे होईल, असे मात्र मला वाटले नव्हते. पण मला अंदाज होता की, भारतीय लोकशाहीसाठी आपण जी पावले उचलतो आहोत, त्यामुळे असे काही कधीतरी घडेल. तसेच मला पूर्ण खात्री आहे की, मी निर्दोष मुक्त होईन. आणि हेच हायकोर्टामध्ये आम्ही सांगतोय की, माझी पोस्ट आहे आणि माझ्यावर जी कलम लावण्यात आली आहेत, ती जुळतच नाहीत. त्यामुळे, पुढच्या एकदोन सुनावणीमध्ये हे प्रकरण निकाली लागेल, अशी मला आशा आहे. डॉ. संग्राम पाटील 10 जानेवारी रोजी भारतात आले होते आणि नियोजित वेळापत्रकानुसार 19 जानेवारीला ते ब्रिटनला परतणार होते. मात्र, त्यांच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर बजावण्यात आल्यामुळे परतीच्या प्रवासादरम्यान त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले. या कारवाईमुळे 19 जानेवारीपासून संग्राम पाटील भारतातच अडकून पडले होते, ज्यावर आता न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे तोडगा निघाला आहे.
