पुणे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल काम करा:राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष डागोर यांचे निर्देश

0
45d80eef-a02c-412e-9606-89e5a1d7aaee_1777984051833.jpg




सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी पुणे जिल्ह्यात एक आदर्श (मॉडेल) काम करावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी दिले आहेत. या मॉडेलची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डागोर यांनी सांगितले की, सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी घरकुल, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने भरावयाच्या पदांबाबतची कार्यवाही गतीने पूर्ण करावी. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेवरही भर दिला. नगर विकास विभागाच्या २२ ऑक्टोबर २००८ च्या शासन निर्णयानुसार, या तारखेनंतर सेवानिवृत्त झालेल्या २५ वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा केलेल्या सफाई कामगारांना तसेच २२ ऑक्टोबर २००८ नंतर सेवेत असताना मृत्यू झालेल्या सफाई कामगारांच्या पात्र वारसांना घरे उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश डागोर यांनी दिले. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे. ही शिबिरे आयोजित करताना सफाई कामगार क्षेत्रात कार्यरत अधिकृत संघटनांना सोबत घ्यावे. विविध योजनांची व्यापक जनजागृती करावी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवांचा कॅशलेस लाभ देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही डागोर यांनी केल्या. सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावून त्याचा अहवाल आयोगाकडे सादर करावा, असे डागोर यांनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी डुडी यांनी, आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात काम केले जाईल आणि मागील बैठकीतील कार्यवाहीचा अहवाल लवकरच सादर केला जाईल, असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed