बदलापूरच्या पीडितेची शाळेची फी शासनाने भरलीच नाही:पीडितेच्या वडिलांची नाराजी, शासनाला पडला आश्वासनांचा विसर?

0
db-temp-cover-marathi-2026-05-05t180216976_1777984377.jpg




बदलापूरमधील एका शाळेत झालेल्या अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यावेळी सरकारने पीडित चिमुकलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आणि कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ही मदत अद्याप मिळालेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटना घडल्यानंतर शासनाने फक्त घोषणाच केल्या, मात्र प्रत्यक्षात मदत काहीच केली नाही. त्यामुळे पीडित चिमुकलीच्या वडिलांनी नाराजीजी व्यक्त केली आहे. बदलापूरच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शासन उचलणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता ही चिमुकली दुसऱ्या एका खाजगी शाळेत पहिलीला जाणार असून तिच्या शिक्षणाच्या शुल्काचा (फी) प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत किंवा फीसाठी निधी मिळालेला नाही. विशेष म्हणजे, मागच्या वर्षीची या चिमुकलीची फी मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी भरली होती, ज्यामुळे तिचे शिक्षण सुरू राहू शकले. शिक्षणाधिकाऱ्यांचे उत्तर: आम्हाला ऑर्डरच नाही यावर्षी पहिलीची फी भरण्यासाठी शाळेकडून विचारणा झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधला. मात्र, तिथेही त्यांना निराशेचाच सामना करावा लागला. शिक्षण अधिकाऱ्यांनी ‘आम्हाला अद्याप शासनाकडून मदत देण्याबाबत कोणतेही अधिकृत आदेश प्राप्त झालेले नाहीत’ असे उत्तर दिल्याने शासनाच्या ढिम्म कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. घोषणा करून टाळ्या मिळवणाऱ्या सरकारला प्रत्यक्ष अंमलबजावणीवेळी मात्र विसर पडल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. काय होती बदलापूरची घटना? ऑगस्ट २०२४ मध्ये बदलापूरमधील एका शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकलींवर शाळेतील शिपाई अक्षय शिंदे याने अत्याचार केल्याचे उघड झाले होते. या घटनेनंतर मोठा जनक्षोभ उसळला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याचा आरोप करत बदलापूर स्थानकात हजारो नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन केले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला अटक केल्यानंतर २३ सप्टेंबर २०२४ रोजी पोलिस कोठडीतून रिमांडसाठी नेत असताना झालेल्या चकमकीत तो ठार झाला होता. अजून किती वाट पाहायची? आरोपीचा अंत झाला असला तरी पीडितेच्या जखमा अजून ओल्या आहेत. त्यातच आता शिक्षणासाठीही कुटुंबाला पदरमोड करावी लागत असल्याने किंवा मदतीसाठी इतरांकडे पाहावे लागत असल्याने शासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पीडित वडिलांनी व्यक्त केलेली नाराजी पाहता, आता तरी शिक्षण विभाग आणि शासन या चिमुकलीला दिलेला शब्द पाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed