महिनाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार:पिकनुकसानीची भरपाईही मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्त्वाची माहिती
![]()
“राज्यातील कर्जमाफीबाबतच्या सर्व माहितीचे संकलन पूर्ण झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या एक महिन्याच्या आत यावर अंतिम निर्णय घेतील,” अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली आहे. या अंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे २ लाखांपर्यंतचे थकबाकीदार शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होणार असून, नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. नेमके काय म्हणाले कृषीमंत्री भरणे? शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “कर्जमाफीबाबतची सर्व तांत्रिक माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. एका महिन्याच्या आत यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.” याशिवाय, मागील दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची मदतही संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत बोलताना कृषिमंत्री भरणे म्हणाले की, बाधित क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना शासनाच्या नियमानुसार लवकरच भरपाईचे वाटप करण्यात येईल. शेतकरी हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. शेतकऱ्यांसाठी ‘कृषी मित्र’ योजना शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग आता ‘कृषी मित्र’ ही नवी योजना राबवणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरात ११ हजार ५८७ पर्यवेक्षकांची जिल्हास्तरावर नियुक्ती केली जाणार आहे. निवड झालेल्या कृषी मित्रांना वर्षाला १८ हजार रुपयांचे मानधन दिले जाणार असून, हे मानधन दर तीन महिन्यांनी त्यांच्या खात्यात जमा केले जाईल. १ जूनपासून ही योजना संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवण्याचा सरकारचा मानस असल्याचे भरणे यांनी सांगितले. आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान गावागावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असून यामुळे ग्रामीण भागात रोजगाराची नवी दारे उघडतील, असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला. पात्रता आणि अटी या योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाने काही निकष निश्चित केले आहेत:
अर्जदाराचे वय ४० वर्षांपेक्षा कमी असावे.
किमान माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.
अर्जदाराकडे उत्तम संवाद कौशल्य आणि समाजकार्याची ओढ असावी.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर करता येणे अनिवार्य आहे.
महिला सक्षमीकरणासाठी या योजनेत ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
