गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा; नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, सुमारे 47 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून साठवणूक करणाऱ्या रेती माफियांविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 47 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव (निजी) शिवारातील गोदावरी नदीकाठी काही जण अवैधरित्या रेती उपसा करून साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसह छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपींकडून नदीत वापरण्यात येणारे 40 तराफे, 9 जुनी इंजिने तसेच साठवून ठेवलेली रेती असा एकूण 47 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या साहित्यामध्ये प्रत्येकी सुमारे 50 हजार रुपये किमतीचे तराफे आणि विविध इंजिनांचा समावेश आहे. नदीपात्रातील काही साहित्य जागीच नष्ट करण्यात आले, तर उर्वरित रेती पंचनामा करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कार्यवाही पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर,पोलीस उप निरीक्षक बाबुराव चव्हाण,पोलीस अंमलदार शेख जमीर,कदम यांनी केली.
संबंधित व्हिडीओ ….
Post Views: 20
