अभियांत्रिकी पदवीधरांना आता एम.एस्सी.ला प्रवेश:नागपूर विद्यापीठाचा बहुविषयक शिक्षणात महत्त्वाचा पुढाकार
![]()
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी पदवीधरांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे. या निर्णयानुसार, कोणत्याही शाखेतील बी.ई./बी.टेक. पदवीधरांना विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांतर्गत भौतिकशास्त्र, गणित, सांख्यिकी आणि अर्थशास्त्र या विषयांतील एम.एस्सी. पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार आहे. सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सेमीकंडक्टर तंत्रज्ञान, प्रगत पदार्थ विज्ञान आणि अक्षय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये केवळ तांत्रिक कौशल्ये पुरेशी नाहीत. या क्षेत्रांमध्ये मूलभूत वैज्ञानिक तत्त्वांचे सखोल ज्ञान आणि विश्लेषणात्मक क्षमता असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना अनुप्रयुक्त ज्ञानाचा मजबूत पाया मिळतो, परंतु भौतिकशास्त्र, गणित आणि सांख्यिकी यांसारख्या मूलभूत विषयांतील सखोल अभ्यास त्यांना संशोधन, नवोन्मेष आणि उच्चस्तरीय समस्या सोडवण्याकडे घेऊन जातो. या नवीन अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना क्वांटम मेकॅनिक्स, नॅनोतंत्रज्ञान, डेटा अॅनालिटिक्स, मशीन लर्निंग, ऑपरेशन्स रिसर्च, वित्तीय गणित आणि बायोस्टॅटिस्टिक्स यांसारख्या आधुनिक विषयांचा अभ्यास करता येईल. यामुळे अर्धसंवाहक उद्योग, डेटा सायन्स, बँकिंग, विमा, संशोधन संस्था, अध्यापन तसेच पीएच.डी. सारख्या उच्च शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र अभियांत्रिकी पदवीधरांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ नवीन करिअर मार्गच उघडणार नाही, तर भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक बहुआयामी दृष्टीकोनही प्रदान करेल.
