मोझरी- डवरगाव मार्गावर नियम धाब्यावर:डांबरी रस्ताच फोडला, चार ठिकाणी खोदकाम : वाहनचालकांचे जीव धोक्यात
![]()
गुरुकुंज मोझरी ते डवरगाव या सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या डांबरी रस्त्यावर चार ठिकाणी रस्ता फोडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे खुलेआम नुकसान होत आहे. हे काम कोण करत आहे, त्याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर शेती, वीटभट्ट्या तसेच एमआयडीसी परिसर आहे. त्यामुळे औद्योगिक व व्यावसायिक हालचाली वाढल्या आहेत. विविध उद्योगांसाठी पाण्याची गरज भागवण्यासाठी काहींनी एका बाजूचे पाणी दुसऱ्या बाजूला नेण्यासाठी थेट रस्ता खोदण्याचा मार्ग स्वीकारला आहे. परिणामी, रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे व तुटलेले भाग निर्माण झाले आहेत. अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. मात्र नेमका रस्ता कोणी फोडला, त्यासाठी परवानगी घेतली होती किंवा नाही, याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. मात्र फोडलेल्या रस्त्यामुळे दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढला आहे. वारंवार धक्के बसल्यामुळे पाठीच्या कण्यासंबंधित आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी हे धोके अधिक वाढतात. स्थानिक नागरिकांच्या मते, “आजपर्यंत रस्ता फोडणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधितांना दंडाची भीती राहिलेली नाही. परिणामी, कोणीही मनमानी पद्धतीने रस्ता खोदत आहे.” कायदेशीरदृष्ट्या पाहता, सार्वजनिक रस्ता विनापरवाना फोडणे हा गंभीर गुन्हा आहे. ‘सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत संबंधितांविरुद्ध कारवाई होऊ शकते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार अशा प्रकरणात मोठा दंड आकारला जातो. रस्ता पूर्ववत करण्याचा संपूर्ण खर्च संबंधितांकडून वसूल केला जातो. कोणत्याही तांत्रिक कामासाठी (जसे पाणी पाइपलाइन, केबल टाकणे इ.) रस्ता खोदणे आवश्यक असल्यास संबंधित विभागाकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी आवश्यक शुल्क व अनामत रक्कम भरावी लागते. परवानगी मिळाल्यानंतरच काम सुरू करता येते. काम पूर्ण झाल्यावर रस्ता पूर्वस्थितीत आणणे ही संबंधित व्यक्ती किंवा संस्थेची जबाबदारी असते.
